

बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : मोहन पाम मार्ग परिसरातील बेवारस वाहनांवर अखेर कारवाईला सुरुवात झाली आहे. ॲड. सौरभ राव यांनी वाहतूक पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीसह ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा थेट परिणाम दिसून आला आहे. या दुहेरी पाठपुराव्यामुळे वाहतूक विभागाने सात बेवारस वाहनांवर नोटिसा बजावल्या आहेत.
अनधिकृत गॅरेजवर कारवाई झाल्यानंतर रस्त्यावरच पडून राहिलेल्या जुन्या व निष्क्रिय वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यामुळे अपघाताचा धोका वाढण्याबरोबरच परिसराच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक पोलिसांनी लावलेल्या नोटिसांमध्ये संबंधित वाहने दीर्घकाळापासून रस्त्यावर निष्क्रिय अवस्थेत उभी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाहनमालकांनी ती तातडीने हटवावीत, अन्यथा ‘टोईंग’द्वारे ती हटवण्यात येतील, असा स्पष्ट इशारा दिला आहे. या कारवाईदरम्यान वाहनांचे कोणतेही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहणार नाही, असेही नमूद केले आहे. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी वाहने बेकायदा उभे करणाऱ्या मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे मोहन पाम मार्ग परिसरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. उर्वरित बेवारस वाहनांवरही तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.