

भिवंडी, ता. ३१ (वार्ताहर) : सतत अस्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करून शहर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी बनविण्यासाठी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी ‘स्वच्छ भिवंडी’ स्पर्धेची घोषणा केली आहे. पालिकेच्या अर्थसंकल्प विशेष महासभेत या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. महापौर नारायण चौधरी यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या स्पर्धेचा कालावधी १ एप्रिल ते ३१ जुलै असा चार महिन्यांचा असणार आहे. वॉर्डनिहाय स्पर्धा राबवून स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वॉर्डांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या वॉर्डाला १० लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी पाच लाख रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी तीन लाख रुपये असे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या निधीचा उपयोग संबंधित वॉर्डातील विकासकामांसाठी केला जाणार आहे. स्पर्धा प्रभाग अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेवक, रहिवासी, शैक्षणिक व धार्मिक संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे. ५०० गुणांच्या या स्पर्धेत कचरा वर्गीकरण, बंद कचरा टाकण्याची ठिकाणे, गृहनिर्माण संकुलांची स्वच्छता, सांस्कृतिक भवन, शैक्षणिक संस्था, खाणावळ व मोठ्या आस्थापनांमधील कचरा व्यवस्थापन, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, ‘टाकाऊपासून टिकाऊ’ उपक्रम, कापडी पिशवी वापर, ‘भांड्यांची बँक’, ‘सेल्फी पॉईंट’, लाकडी ओडक्यापासून कलाकृती, स्वच्छता दूत म्हणून स्वयंसेवक, शिक्षक, डॉक्टर, खेळाडू, धार्मिक, पुढारी यांची निवड करणे, शून्य कचरा उपक्रम; तसेच घंटागाडी लॉगबुक व कंपोस्ट निर्मिती यांसारख्या विविध निकषांवर गुणांकन केले जाणार आहे.
स्पर्धेचे उद्दिष्ट
स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवणे, ओला-सुका कचरा वर्गीकरणाची सवय लावणे आणि शहरातील स्वच्छतेची पातळी उंचावणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयुक्त अनमोल सागर यांनी स्पष्ट केले. स्पर्धेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्यात दोन्ही अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन कचरा वर्गीकरण करावे आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले.