

कल्याणमध्ये शस्त्रसाठा जप्त
१९ वर्षीय तरुण अटकेत; तलवारी, गुप्तीसह चाकू हस्तगत
डोंबिवली, ता. ३० : कल्याण पश्चिमेकडील घास बाजार परिसरातील एका घरात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला शस्त्रसाठा बाजारपेठ पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून प्रतिबंधित हत्यारे जप्त केली आहेत.
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार बी. आर. बागुल यांना घास बाजारातील ''युसुफ हाईट्स'' इमारतीमधील एका सदनिकेत शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे आणि पथकाने मध्यरात्री ११च्या सुमारास संबंधित घरात छापा टाकला. झडतीदरम्यान घरातून सुरा, मुठीची गुप्ती आणि लोखंडी चाकू असा मोठा साठा आढळून आला. याप्रकरणी युवेश हनिफ सय्यद (१९) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युवेश हा पेशाने मोबाईल रिपेरिंगचे काम करतो. प्रतिबंधित हत्यारे जवळ बाळगल्याप्रकरणी आणि पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शस्त्रसाठ्याचे गूढ कायम
मोबाईल रिपेरिंगचे काम करणाऱ्या या तरुणाने एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घरात का केला होता? ही हत्यारे त्याने कोठून आणली आणि त्याचा वापर तो कशासाठी करणार होता? या दिशेने पोलिस सध्या तपास करत आहेत. या धडक कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे, अंबिका घस्ते, हवालदार राहुल ईशी, बी. आर. बागुल, एम. आर. चित्ते आणि पी. एम. बाविस्कर यांनी सहभाग घेतला.