

‘तुटक’ सामाजिक वातावरणामुळे अमेरिका सोडली
‘जोडीने चालूया’ कार्यक्रमात घरत दाम्पत्याचा उलगडला जीवनप्रवास
डोंबिवली, ता. ३० : उच्च शिक्षण आणि करिअरच्या अफाट संधी असूनही, अमेरिकेतील विरळ सामाजिक वीण आणि जिव्हाळ्याच्या अभावामुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन ज्येष्ठ रसायनतज्ज्ञ डॉ. संदीप घरत यांनी केले. ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ आणि ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’ यांच्या वतीने आयोजित ‘जोडीने चालूया’ या विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराच्या वक्रतुंड सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. संदीप घरत आणि त्यांच्या पत्नी, उल्हासनगर येथील कुंदनानी फार्मसी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या मंजिरी घरत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ सल्लागार माधव जोशी यांनी या दाम्पत्याशी संवाद साधला. बेताच्या आर्थिक परिस्थितीत डोंबिवलीच्या डी.एन.सी. महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर, डॉ. घरत यांनी मुंबईतील ‘आयसीटी’ (तत्कालीन यूडीसीटी)मधून पदवी आणि पुढे अमेरिकेत पीएच.डी. पूर्ण केली. पुढे अमेरिकेत स्थायिक होण्याच्या संधी असतानाही, तेथील समाजजीवनातील कोरडेपणा त्यांना बोचत राहिला. आम्ही माणसांत राहणारे आहोत, त्यामुळे तिथे मन रमत नव्हते, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. मंजिरी घरत यांनीही अमेरिकेतील वास्तव्यात ‘कोणतेही काम लहान नसते’ या वृत्तीने काम केल्याचे सांगत, कष्टाने संधी निर्माण केल्याचे नमूद केले.
मायभूमीची ओढ कायम
विवाहानंतर अमेरिकेत मुलाचा जन्म झाला असतानाही, त्याच्या भविष्यासाठी आणि कौटुंबिक मूल्यांसाठी भारतात परतण्याचा निर्णय या दाम्पत्याने घेतला. अमेरिका सोडल्याची खंत कधीच वाटली नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भारतात परतल्यावर डॉ. घरत यांनी औषधनिर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर, तर मंजिरी घरत यांनी फार्मसी शिक्षण आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. या कार्यक्रमात माधव जोशी यांच्या खुसखुशीत आणि तिरकस प्रश्नांना घरत दाम्पत्याने दिलखुलास उत्तरे दिली. याप्रसंगी ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’चे संचालक पुंडलिक पै यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.