

तिसगाव नाक्यावर मोबाईल दुकान फोडले
२० ते २५ संच लंपास; भरचौकात धाडसी चोरी
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : शहरातील वर्दळीच्या तिसगाव नाका परिसरात सोमवारी (ता. ३०) पहाटे अज्ञात चोरट्यांनी एका मोबाईल दुरुस्तीच्या दुकानाचे शटर उचकटून धाडसी चोरी केली. भरचौकातील दुकान फोडून चोरट्यांनी ग्राहकांचे दुरुस्तीसाठी आलेले सुमारे २० ते २५ मोबाईल संच लंपास केले आहेत. या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तिसगाव नाका येथील मीरा अपार्टमेंटच्या तळमजल्यावर नीलेश चव्हाण यांचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला आणि महागड्या मोबाईल संचांवर डल्ला मारला. एका सतर्क रिक्षाचालकाला दुकानाचे शटर तुटलेले दिसताच त्याने तत्काळ दुकानमालक चव्हाण यांना माहिती दिली, त्यानंतर ही चोरी उघडकीस आली.
तपासासाठी सीसीटीव्हीचा आधार
घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तिसगाव नाका हा परिसर ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत येत असल्याने येथे उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. चोरीची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यांत कैद झाली असण्याची दाट शक्यता असून, पोलिस त्या आधारे आरोपींचा माग काढत आहेत.
व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट
भरचौकात आणि सीसीटीव्हीच्या निगराणीत अशा प्रकारे चोरी होत असेल, तर सुरक्षितता कुठे आहे, असा सवाल करत स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी आणि रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापारीवर्गाकडून केली जात आहे. कोळसेवाडी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, लवकरच चोरट्यांना जेरबंद करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.