चेंबूरमधील ‘सिग्नल शाळा’ भटक्या मुलांसाठी ठरतेय आशेचा किरण

चेंबूरमधील ‘सिग्नल शाळा’ भटक्या मुलांसाठी ठरतेय आशेचा किरण
Published on

‘सिग्नल शाळे’तून भटक्या मुलांना शिक्षणाची नवी दिशा
चेंबूरमध्ये अभिनव उपक्रम; पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
जीवन तांबे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : चेंबूरमध्ये सुरू झालेली ‘सिग्नल शाळा’ सिग्नलवर भटकंती करणाऱ्या पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
मुंबई महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथील अमर महल जंक्शन परिसरात सांताक्रूझ-चेंबूर उड्डाणपुलाखाली रंगीबेरंगी आठ शिपिंग कंटेनर्समध्ये हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
या शाळेची सुरुवात चेंबूर, घाटकोपर आणि मानखुर्द येथील वस्त्यांमधून मुलांना बसने आणून केली जाते. शाळेत आल्यानंतर मुलांच्या दिवसाची सुरुवात अंघोळ, दात घासणे आणि स्वच्छ शालेय गणवेश परिधान करण्यापासून होते. या उपक्रमाला सिग्नलवरील भटक्या मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पारधी हा भटकंती करणारा समाज म्हणून ओळखला जातो. उपजीविकेसाठी या समाजातील अनेक कुटुंबे आपल्या मुलांसह शहरातील सिग्नलवर फुले, खेळणी किंवा इतर वस्तू विकतात. आर्थिक अडचणी आणि सामाजिक दुर्लक्षामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात. ही दरी भरून काढण्यासाठी ‘सिग्नल शाळा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या शाळेचे उद्‌घाटन १२ जानेवारीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते झाले. येथे बालवाडीपासून ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, गणित यांसोबतच स्वच्छता, शिस्त आणि विविध कला-कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. भरतकाम, शिवणकाम, मेणबत्ती व अगरबत्ती निर्मिती, नर्सिंग, ब्युटी पार्लर, बुक बाइंडिंग, प्लंबिंग, वेल्डिंग, फॅब्रिकेशन, बागकाम आणि इलेक्ट्रिशियन अशा विविध कौशल्यांचा यात समावेश आहे.
मानखुर्द, घाटकोपर, कुर्ला आणि चेंबूर परिसरातील मुलांना या शाळेत प्रवेश दिला जातो. सकाळी ८.३० वाजता बस वस्तीवर जाऊन मुलांना शाळेत आणते. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत पारधी भाषेच्या माध्यमातून विशेष अभ्यासक्रमाद्वारे शिक्षण दिले जाते.

शाळेच्या दिनक्रमात राष्ट्रगीत, प्रार्थना, स्वच्छता मार्गदर्शन, पौष्टिक आहार आणि उपस्थिती नोंद यांचा समावेश असतो. त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्राथमिक, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा गटांत वर्गीकरण केले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ, चित्रकला, कौशल्याधारित शिक्षण आणि पर्यावरणाधारित अध्यापनावर भर दिला जातो. दिवसाच्या शेवटी शिक्षकांच्या उपस्थितीत मुलांना त्यांच्या पालकांकडे सुरक्षितपणे सोपवले जाते.
शाळेत विज्ञान प्रयोगशाळा, संगणक व आयसीटी लॅब, ग्रंथालय, व्याख्यानमाला, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, स्वयंपाकघर तसेच खेळाच्या सुविधा उपलब्ध आहेत. नियमित आरोग्य तपासणी आणि शैक्षणिक साहित्यही पुरवले जाते. शिक्षक आणि स्वयंसेवक मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधत असल्याने मुलांना शाळेबाबत आपुलकी वाटू लागली आहे. काही मुलांनी नियमित शाळांमध्ये प्रवेश घेण्यासही सुरुवात केली आहे.
या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यात नव्या संधी निर्माण होत असून, भविष्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे, अशी माहिती व्यवस्थापक सपना पवार आणि मुख्याध्यापिका आरती परब यांनी दिली.

ठाणे आणि नेरूळ येथे सुरू झालेल्या या उपक्रमानंतर आता मुंबईतही हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्थलांतरित भटक्या विमुक्त कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा लवचिक आणि परिणामकारक उपक्रम ठरत आहे.
- भाटू सावंत, संस्थेचे संस्थापक व सीईओ

पूर्वी मला वाचता येत नव्हते. आता मी नीट वाचू शकते. मी आता दररोज शाळेत येणार आहे.
- तनू काळे, विद्यार्थिनी

इथे खेळायला खूप मिळते. वाचन आणि कौशल्य शिक्षणही मिळते. त्यामुळे खूप आनंद होतो.
- सनी पासवान, विद्यार्थी

सुरुवातीला शाळेत येण्याचा कंटाळा येत होता. पण आता आमच्या भाषेत शिक्षण मिळते तसेच खायला आणि खेळायलाही मिळते. त्यामुळे मी नियमित शाळेत येणार आहे.
- सिद्धू काळे, विद्यार्थी

चित्रे आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून संवाद साधून शिकवले जाते. मुलांची आकलनशक्ती उत्तम असून, त्यांना सोप्या पद्धतीने शिक्षण दिले जाते. ‘सिग्नल शाळा’ हे शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
- तेजस्वी बोऱ्हाडे, शिक्षिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com