

कर्जत पोलिस मैदान होणार बंदिस्त
पार्किंग व वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर, सुशोभीकरणाला प्राधान्य, नागरिकांकडून नियोजनावर प्रश्नचिन्ह
कर्जत, ता. ३१ (बातमीदार) : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पोलिस मैदानाला कंपाउंड घालून बंदिस्त करण्याच्या निर्णयामुळे पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मैदानाचे सुशोभीकरण व वॉकिंग पाथ उभारणीचे काम सुरू करण्यात आले असून, यासाठी सुमारे एक कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नगर परिषदेने शहरात पुरेशी पार्किंग व्यवस्था न केल्याने नागरिक आतापर्यंत या मैदानाचा वाहनतळ म्हणून वापर करत होते. पोलिस ठाणे, शासकीय रुग्णालय, खासगी दवाखाने आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी हे मैदान मोठा आधार होते. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी हे सोयीचे पार्किंग ठिकाण होते.
मैदान बंदिस्त झाल्यानंतर पर्यायी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच परिसरातील मुलांच्या खेळासाठी उपलब्ध असलेली जागा कमी होणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. शहरात स्वतंत्र खेळाचे मैदान राखीव नसल्याने ही समस्या अधिक तीव्र झाली आहे.
दरम्यान, प्रशासकीय भवनासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही होत आहे. या जागेचा उपयोग पार्किंगसाठी करता आला असता, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकट :
नागरिकांचा सवाल
नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून केवळ सौंदर्यीकरणावर भर देणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. पार्किंग व वाहतूक नियोजनाला प्राधान्य देण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
कोट :
“मैदानाच्या चारही बाजूंनी कंपाउंड उभारून दोन प्रवेशद्वारे ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना चालण्यासाठी व व्यायामासाठी सुरक्षित जागा उपलब्ध होईल. मात्र, पार्किंगच्या दृष्टीने योग्य नियोजन आवश्यक आहे.”
— राहुल देवांग, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कर्जत
कर्जत : पोलिस मैदानातील कामाची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता साळुंखे आणि पोलिस निरीक्षक उमेश पाटील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.