ठाणे महापालिकेत आरोपांची ठिणगी

ठाणे महापालिकेत आरोपांची ठिणगी
Published on

महापालिकेत निधीवरून आरोप-प्रत्यारोप
भाजप-शिंदे सेनेत शाब्दिक चकमक; महापौरांचा हस्तक्षेप
ठाणे, ता. ३० : महापालिकेच्या अर्थसंकल्पी विशेष महासभेत सोमवारी निधी वाटपाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे सेना आणि भाजपमध्ये तीव्र संघर्षाची ठिणगी पडली. राज्य सरकारकडून आलेल्या निधीचे वाटप ठरावीक नगरसेवक आणि चक्क शाखाप्रमुखांना करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली.

महासभेत बोलताना मनोहर डुंबरे यांनी प्रशासकीय पारदर्शकतेवर बोट ठेवले. गेल्या तीन वर्षांत शासनाकडून आलेला निधी केवळ ठरावीक नगरसेवकांनाच दिला गेला. एवढेच नाही तर पदाधिकाऱ्यांच्या बाहेरील व्यक्तींना म्हणजेच शाखाप्रमुखांनाही निधी वाटप झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. या विधानामुळे शिंदे सेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. विकास रेपाळे आणि रमाकांत मढवी यांनी हे आरोप फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे सभागृहात दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये मोठी शाब्दिक चकमक झाली. वातावरण चिघळत असल्याचे पाहून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी डुंबरे यांना केलेले आरोप गंभीर असल्याचे नमूद करीत त्याबाबतचे ठोस पुरावे सभागृहासमोर सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतरच सभागृहातील गदारोळ शांत झाला.

प्रशासनाचे वाभाडे
निधी वाटपाव्यतिरिक्त भाजप नगरसेवकांनी शहरातील मूलभूत समस्यांवरून प्रशासनाला धारेवर धरले. मराठी शाळांची दुरवस्था, मुख्याध्यापकांची रिक्त पदे आणि आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले. टीएमटी बस सेवेतील अपुरेपणा, नव्या बस खरेदीतील पारदर्शकतेचा अभाव आणि कचरा व्यवस्थापनातील कथित भ्रष्टाचार यावरही प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. तसेच २००९च्या मालमत्ता कर ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने पालिकेचे नुकसान झाल्याचे डुंबरे यांनी नमूद केले.

आमदारांची उपस्थिती
विशेष म्हणजे भाजप आमदार संजय केळकर यांनी सभागृहात उपस्थित राहून संपूर्ण चर्चेचा आढावा घेतला. सत्तेत असूनही प्रशासकीय चुकीच्या कामांवर लक्ष ठेवण्याची भूमिका भाजपने यानिमित्ताने स्पष्ट केली आहे. मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, वैभव कदम यांसह अनेक भाजप नगरसेवकांनी या वेळी आक्रमक पवित्रा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com