

४,६५३ कोटींचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प
पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छ शहरासाठी मोठी आर्थिक तरतूद
पनवेल आयुक्तांकडून स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर
पनवेल, ता. ३० (बातमीदार) : पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सोमवारी (ता. ३०) २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी चार हजार ६५३ कोटी १० लाख रुपयांचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर केला. या अंदाजपत्रकात १० लाख रुपये शिल्लक दर्शवण्यात आली आहे.
वाढत्या नागरीकरणाचा वेग, नव्याने समाविष्ट होत असलेल्या परिसरांच्या गरजा, मूलभूत सुविधांवरील वाढता ताण आणि भविष्यातील पायाभूत सुविधा उभारणी या सर्वांचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार केला आहे. या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर देतानाच रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्यसेवा, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, अग्निशमन, उद्याने, क्रीडा सुविधा आणि प्रशासकीय बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी राखीव ठेवला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये सर्वाधिक हिस्सा आरंभीच्या शिल्लक रकमेचा आहे.
उत्पन्नाचे प्रमुख स्रोत
आरंभीची शिल्लक २९.२७%
मालमत्ता कर ३२.५०%
विकास शुल्क (यूडीसीपीआर) ११.०७%
जीएसटी अनुदान ९.८४%
मुद्रांक शुल्क ०.६४%
१५व्या वित्त आयोगातून ०.६४%
झोपडपट्टी सुधारणेअंतर्गत १.०७%
अमृत पाणीपुरवठा योजना ३.६८%
इतर अनुदाने व भांडवली जमा ७.५०%
इतर करेतर महसूल ०.७७%
व्याजापोटी उत्पन्न ५.३७%
असाधारण लेखे व इतर परतावा १.३३%
खर्च
प्रशासनिक यंत्रणा सक्षमीकरण २.६४%
नवीन प्रशासकीय इमारत ४.३०%
होल्डिंग पाँडसाठी १.२९%
बहुउद्देशीय सभागृह आणि समाजमंदिरासाठी ०.८६%
दैनंदिन बाजार विकास १.३७%
पायाभूत सुविधांसाठी १.३३%
घनकचरा व स्वच्छता व्यवस्थापन ७.०५%
वैद्यकीय व आरोग्यसेवा ४.६०%
अग्निशमन व सुरक्षा व्यवस्थापन १.६७%
शहराच्या विकासाचा मार्ग नकाशा
१) नागरी जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न
रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरणासाठी ३८५ कोटींची तरतूद हा अर्थसंकल्पातील मोठा घटक ठरला आहे. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत रस्ते, मुख्य मार्ग आणि जोडरस्त्यांना गती देण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. क्रीडांगणांसाठी ३० कोटी, बागा व उद्यान विकासासाठी १५१ कोटी राखून नागरी जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाणीपुरवठा क्षेत्रात शिलार धरण प्रकल्पासाठी १५० कोटी आणि मलनिस्सारण व पाणी पुनर्वापर केंद्रासाठी १५४ कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत. भुयारी गटर व मलनिस्सारणासाठी स्वतंत्र १६४ कोटींची तरतूद करून जलनिस्सारणाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आहे. विद्युत व्यवस्थेसाठी २४७ कोटी राखले असून, रस्त्यावरील प्रकाशयोजना आणि वीज यंत्रणा विस्तारासाठी याचा उपयोग होणार आहे.
२) शिक्षणाकडे लक्ष
शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शिक्षणासाठी २७४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा, वर्गखोल्या, शैक्षणिक सुविधा आणि मनुष्यबळासाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे. भूखंड हस्तांतरण व भूसंपादनासाठी २१२ कोटी राखून भविष्यातील प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे. माहिती व तंत्रज्ञानासाठी २४३ कोटींची तरतूद करून डिजिटल प्रशासनाकडे महापालिकेची वाटचाल दिसून येते.
३) १० लाख शिल्लक
प्राथमिक सोयी सुविधा व नगरोत्थान अनुदानांतर्गत ५६ कोटी राखण्यात आले आहेत. परतावे, विविध विभागांतील महसुली व भांडवली कामांसाठी १,६६५ कोटी ८० लाखांची मोठी तरतूद असून, उर्वरित १० लाख अखेर शिल्लक ठेवले आहेत.
एकूणच हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा दस्तऐवज नसून, पुढील काही वर्षांसाठी शहराच्या विकासाचा मार्ग नकाशा मानला जात आहे. आगामी काळात या तरतुदींची अंमलबजावणी कितपत वेगाने होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पनवेल महापालिकेचा हा सर्वसमावेशक १० लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. यामध्ये करदात्यांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पनवेल महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल या अनुषंगाने विशेष लक्ष दिले आहे. पनवेलचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून हे अंदाजपत्रक सादर केले असून, या आर्थिक वर्षामध्ये आपल्या परिसरात नक्कीच विकासात्मक पाऊल पालिका टाकेल, अशी ग्वाही यानिमित्ताने देत आहे. शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठा याशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.