नवी मुंबई परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक बस, ई-चार्जिंग व स्मार्ट व्यवस्थापनावर भर

नवी मुंबई परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात  पर्यावरणपूरक बस, ई-चार्जिंग व स्मार्ट व्यवस्थापनावर भर
Published on

पर्यावरणपूरक बस, ई-चार्जिंगवर भर
नवी मुंबई परिवहन सेवेचे ६५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर
वाशी, ता. ३० (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. नवी मुंबई परिवहन सेवेचे ६५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर केला आहे.
परिवहन समिती सभापती विकास झंजाड यांनी तयार केलेले अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. त्यानंतर स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सोमवारी (ता. ३०) महापौर सुजाता पाटील यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात विशेषतः पर्यावरणपूरक व आधुनिक परिवहन सेवेवर भर देण्यात आला आहे. नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या, नवीन सुरू झालेले विमानतळ आणि सार्वजनिक वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता परिवहन सेवेत मोठे बदल व सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई परिवहनचा हा अर्थसंकल्प पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानाधारित आणि प्रवासी-केंद्रित परिवहन व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

तपशील रक्कम
एकूण महसुली व भांडवली उत्पन्न ६५२ कोटी
एकूण प्रस्तावित खर्च ६५१ कोटी ९० लाख
आरंभीची शिल्लक ९.५५ लाख
अखेरची शिल्लक १० लाख


सार्वजनिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा
नवी मुंबईत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध वाहनतळांच्या जागांवर सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर १० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे खासगी आणि सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहनधारकांना सुलभ चार्जिंग सुविधा मिळणार असून, हरित ऊर्जेचा वापर वाढीस लागणार आहे. परिणामी, प्रदूषणात घट होण्यास मदत होणार आहे.

नवीन बसमार्गांचा विस्तार
१ नवी मुंबईत लवकरच सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन बसमार्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२ मुंबई महानगर क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या आणि प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गांवर बससेवा वाढविण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, जलद आणि परवडणारी सेवा उपलब्ध होईल.

आधुनिक आयटीएमएस प्रणालीद्वारे स्मार्ट परिवहन
नवी मुंबई परिवहन सेवेत अत्याधुनिक आयटीएमएस प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे बसचे वेळापत्रक, वाहतूक व्यवस्थापन, ट्रॅफिक नियंत्रण आणि प्रवाशांना वेळेवर सेवा देणे अधिक प्रभावीपणे शक्य होणार आहे.

पर्यावरणपूरक बस ताफ्याचा विस्तार
महापालिकेने जुन्या व कालबाह्य डिझेल बस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या १५० सीएनजी बस कार्यरत असून, पुढील आर्थिक वर्षात १०० नवीन सीएनजी व इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहेत. यामुळे प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.

सोलर पॅनेल व बस टर्मिनस विकास
परिवहन उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बस टर्मिनसचे आधुनिकीकरण व विकास करण्यात येणार आहे. तसेच, आगार आणि बस स्थानकांवर सोलर पॅनेल बसवून सौरऊर्जेचा वापर वाढविणार आहे. यामुळे वीज खर्चात मोठी बचत होणार असून, पर्यावरणपूरक ऊर्जा वापरास चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com