

म्हाडाच्या घरांची काेटींची उड्डाणे
‘अल्प उत्पन्न’ची १३९ घरांच्या किमती काेटीच्या पुढे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमती पाहून डाेळे पांढरे हाेण्याची वेळ आली आहे. मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या अल्प उत्पन्न गटातील तब्बल १३९ घरांच्या किमती एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहेत. याच गटातील वरळीतील चार घरांच्या किमती दाेन कोटी आठ लाख रुपये आहेत. त्यामुळे या घरांसाठी अल्प उत्पन्नधारक अर्ज करणार का, ही घरे घेणे त्यांना परवणार का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने दाेन हजार ६४० घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहिरात काढली आहे. साेमवारी (ता. ३०) दुपारपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. लाॅटरीतील घरांच्या किमती ३२ लाखांपासून सहा कोटी ८२ लाख रुपयांपर्यंत आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती ४०-५० लाखांच्या घरात असल्या तरी अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमतींमुळे अर्जदारांचा उत्साह काहीसा कमी होणार आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ८५८ घरे असून, त्यापैकी मुंबई शहरातील खासगी विकसकांकडून म्हाडाला उपलब्ध झालेल्या मुंबई शहरातील वरळी, दादर, मुंबई सेंट्रलसह जुहू, विक्रोळी अशा हायफाय परिसरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर आहेत.
क्षेत्रफळाच्या अधारे उत्पन्न गट
नियमानुसार अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३० चौरस मीटरपर्यंतचे घर देय असते. अल्प उत्पन्न गटासाठी ३०-६० चौरस मीटरचे तर मध्यम उत्पन्न गटासाठी ६० चौरस मीटरचे घर देय आहे. क्षेत्रफळाच्या अधारे कोणते घर कोणत्या उत्पन्न गटासाठी हे निश्चित केले जाते. त्यामुळे उच्चभ्रू वस्तीत ३०-६० चौरस मीटरचे घर असेल तर ते अल्प उत्पन्न गटासाठी जाते. या ठिकाणचा रेडिरेकनर दर जास्त असल्याने त्या घरांच्या किमती आवाक्याबाहेर असल्याचे दिसते. या किमती आणि उत्पन्न गट हे नियमानुसारच निश्चित केले जात असल्याचे म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
ताडदेवमध्ये सर्वाधिक सात काेटींचे घर
म्हाडाच्या लाॅटरीत ताडदेव येथील क्रिसेंट टाॅवरमधील दोन घरांचा समावेश करण्यात आला आहे. सुमारे १५०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या घरांच्या किमती सर्वाधिक सहा कोटी ७७ लाख आणि सहा कोटी ८२ लाख रुपये आहेत. या महागड्या घरांसाठी कोण अर्ज करणार, याकडे म्हाडासह सामान्यांचे लक्ष लागले आहे.
-----
ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज स्वीकृतीला प्रारंभ
म्हाडाने जाहीर केलेल्या लाॅटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आज दुपारी ‘गो लाइव्ह’ प्रारंभ करण्यात आला. विकसकांकडून मिळालेल्या अनेक सदनिका ‘जशा आहे त्या स्थितीत’ विक्रीकरिता लाॅटरीत उपलब्ध केल्या आहेत; मात्र त्यांचा ताबा देण्यापूर्वी डागडुजी, दुरुस्ती करून दिली जाईल. तसेच सोडतीत लागलेल्या सदनिकेचा मालमत्ता कर व सहकारी गृहनिर्माण संस्थेचा देखभाल खर्च थकीत असल्यास म्हाडातर्फे तो भरला जाईल, अशी ग्वाही संजीव जयस्वाल यांनी दिली.
---------
चार तासांत ४३० अर्ज
म्हाडाने आज दुपारी ३ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली. पहिल्या दीड तासांत २६२ जाणांनी ऑनलाइन अर्ज केला होता, तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल ४३० जणांनी अर्ज केला होता. यातील १६५ जणांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज अंतिम केला आहे. २०२४ मध्ये म्हाडाने मुंबईतील २,०३० घरांसाठी काढलेल्या लाॅटरीकरिता एक लाख १३ हजार अर्ज आले होते.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.