

गोवेली ग्रामीण रुग्णालयाची निष्काळजी
१० महिन्यांच्या बाळाला दिली मुदत संपलेली औषधे
टिटवाळा, ता. ३१ : विधानसभेत निकृष्ट औषधांच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू असतानाच, कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील प्रशासनाने १० महिन्यांच्या एका लहान बाळाला चक्क मुदत संपलेले औषध दिल्याने खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणावर संताप व्यक्त होत आहे.
कल्याण ग्रामीण भागातील एका १० महिन्यांच्या बाळाला ताप आणि अंगावर पुळ्या आल्याने उपचारासाठी गोवेली ग्रामीण रुग्णालयात आणले होते. डॉक्टरांनी तपासणी करून औषधे लिहून दिल्यानंतर, औषध खिडकीवरून ‘ओपीक्लेव’ हे औषध देण्यात आले; मात्र एका सामाजिक कार्यकर्तीच्या सतर्कतेमुळे हे औषध २ फेब्रुवारी २०२६ रोजीच मुदत संपलेले असल्याचे उघड झाले. वेळीच लक्ष गेल्याने मोठा अनर्थ टळला. काही दिवसांपूर्वीच अंबरनाथमधील वांगणी आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेला खराब औषध दिल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला होता. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, गोवेलीतील या घटनेवरून प्रशासकीय धाक उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
रुग्णालयाबाबत तक्रारींचा पाढा
स्थानिक नागरिकांनी या रुग्णालयाबद्दल अनेक गंभीर आरोप केले आहेत. रुग्णांना न तपासता औषधे देणे आणि उद्धट वर्तणूक करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. तसेच मुदत संपलेली औषधे वेगळी करून त्यांची विल्हेवाट लावण्याऐवजी ती थेट रुग्णांना दिली जात आहेत.
वेळेवर वैद्यकीय अहवाल न देणे आणि गरिबांची अडवणूक करणे, असे प्रकार घडत असल्याचे म्हटले जात आहे.
हा प्रकार अत्यंत गंभीर आणि अक्षम्य आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.