

गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास
नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : सीवूड्स येथील प्रसिद्ध ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये एका १३ वर्षीय गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण करणाऱ्या आशीष कांचन या नराधमाला बेलापूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. ३०) १० वर्षे सश्रम कारावास आणि २,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर या घटनेतील पीडितेला न्याय मिळाला आहे.
ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये सप्टेंबर २०१७मध्ये ही घटना घडली होती. गतिमंद पीडित मुलगी आईसोबत मॉलमध्ये गेली होती. त्या वेळी पीडिता वॉशरूमला जात असताना एका दुकानात कामाला असलेल्या आशीष कांचन याने तिला नवीन जागा दाखविण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले. त्यानंतर त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. त्या वेळी आशीषने या कृत्याचे मोबाईलवर चित्रीकरण करून पीडितेला धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने भीतीपोटी ही घटना कोणालाही सांगितली नव्हती. मात्र शाळेतील समुपदेशकांनी मुलीच्या वागण्यातील बदल ओळखून तिची चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला.
त्यानंतर एनआरआय पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार आशीष कांचनला अटक करून त्याच्याविरोधात बेलापूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधीश पी. ए. साने यांनी पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे सोमवारी आशीष कांचन याला १० वर्षे सश्रम कारावास आणि २,५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्त वर्षा चंदने यांनी पीडितेची बाजू प्रबळपणे मांडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. टी. थोरात, पैरवी अधिकारी महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याणी पिसाळ आणि कोर्ट अंमलदार महिला पोलिस शिपाई शिंदे यांनी या गुन्ह्याचा पाठपुरावा करून आरोपीला शिक्षा मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.