

ठाणे जिल्ह्यात अवतरणार ‘ताऱ्यांचे विश्व’
शहापुरात पहिल्या तारांगणाचे ५ एप्रिलला उद्घाटन
ठाणे, ता. ३१ : आकाशातील अनंत ताऱ्यांचे आणि ग्रह-मालिकांचे गूढ उलगडण्यासाठी आता ठाणेकरांना मुंबईचे नेहरू तारांगण गाठण्याची आवश्यकता उरणार नाही. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, निसर्गरम्य शहापूर तालुक्यातील साकडभाव येथे जिल्ह्यातील पहिले भव्य आणि अत्याधुनिक तारांगण तसेच वेधशाळा साकारली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन रविवार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या हस्ते संपन्न होणार असून, यामुळे ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि पर्यटन नकाशावर एक नवे दालन उघडले जाणार आहे.
आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे अद्भुत विश्व अनुभवण्यासाठी आता ठाणेकरांना मुंबईची वारी करण्याची गरज उरणार नाही. शहापूर तालुक्यातील साकडभाव येथे जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक तारांगण आणि वेधशाळा साकारली आहे. या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन रविवार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या हस्ते होणार आहे.
खगोलशास्त्राची बालपणापासून असलेली आवड केवळ छंदापुरती मर्यादित न ठेवता, नीलेश ठाकूर आणि गिरीश ठाकूर या बंधूंनी ती प्रत्यक्षात उतरवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि खगोलशास्त्राचा अभ्यास सुलभ व्हावा, या उदात्त हेतूने साडेतीन एकर परिसरात हा प्रकल्प उभारला आहे. या अत्याधुनिक तारांगणात ५६ आसनांची बैठक व्यवस्था असून, संपूर्ण घुमटाकार पडद्यावर प्रेक्षकांना अंतराळाचा जिवंत अनुभव घेता येईल. येथे ३० मिनिटे ते १ तासाचे विशेष खेळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत दाखवले जाणार आहेत.
प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील सुसज्ज वेधशाळा. येथे १६, १४, १० आणि ६ इंच व्यासाच्या आरशांच्या चार शक्तिशाली दुर्बिणी बसवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, एका बटणावर या वेधशाळेचे छप्पर स्वयंचलित पद्धतीने मागे सरकते, ज्यामुळे आकाश निरीक्षणात कोणताही अडथळा येत नाही. या दुर्बिणींतून शनीची वलये, गुरूचे उपग्रह आणि दूरवरच्या आकाशगंगांचे निरीक्षण करणे शक्य आहे. तसेच, ‘सोलर फिल्टर’च्या सहाय्याने दिवसा सूर्यावरील डाग आणि सौरज्वालांचे सुरक्षितपणे निरीक्षण करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेधशाळेचे खास आकर्षण
प्रकल्पात १६, १४, १० आणि ६ इंच व्यासाच्या चार अत्याधुनिक दुर्बिणी बसवण्यात आल्या आहेत. गुरूचे उपग्रह, शनीची वलये आणि दूरवरच्या दीर्घिका स्पष्टपणे पाहता येतील. विशेष ‘सोलर फिल्टर’ दुर्बिणीद्वारे दिवसा सूर्यावरील सौरज्वाला आणि डाग सुरक्षितपणे पाहता येतील.
डिजिटल सुविधा
दुर्बिणी संगणकाला जोडलेल्या असल्याने अवकाशातील दृश्यांचे थेट चित्रीकरण आणि मोठ्या पडद्यावर प्रदर्शन शक्य होणार आहे.
रात्रभर ‘स्टार गेजिंग’ची संधी
खगोलप्रेमींसाठी येथे रात्रभर आकाश निरीक्षणाची विशेष सोय आहे. अभ्यासकांसाठी स्वतंत्र खोल्या, ग्रुपसाठी डॉर्मिटरी आणि मार्गदर्शकांचे पथक सज्ज असेल. प्रदर्शनी हॉल, फोटो स्पॉट्स आणि कॅन्टीनमुळे येथे ‘सायन्स टुरिझम’ला मोठी चालना मिळणार आहे.