

रखरखत्या उन्हात पक्षी उष्माघाताचे शिकार
१० दिवसांत नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरात सहा पक्ष्यांचा मृत्यू
बेलापूर, ता. ३१ (बातमीदार) ः मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, मुक्या प्राणी आणि पक्ष्यांनादेखील वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तापमानात चढ-उतार होत असल्याने मागील १० दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरात सहा पक्ष्यांचा मृत्यू, तर १२ हून अधिक पक्षी-प्राण्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती वर्ल्ड वेल्फेअर असोसिएशनद्वारे देण्यात दिली.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून ३२ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान निदर्शनास येत आहे, तर दुपारच्या आसपास या तापमानवाढीमुळे तीव्र उष्णता जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत सतत होणारी वाढ नागरिकांसोबत पक्षी-प्राण्यांवरही परिणामकारक ठरत आहे. गेल्या १० दिवसांत जवळपास सहा पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर १२ हून अधिक पक्षी-प्राणी आजतागायत पशुवैद्यकीय केंद्रात उपचार घेत आहेत. दरम्यान, उष्माघाताने मृत्युमुखी पडणाऱ्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण कबुतरांचे असून, गेल्या १० दिवसांत तीन कबुतर मरण पावले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या इतर पक्ष्यांमध्ये कावळा, चिमणी, साळुंकी आदींचा समावेश आहे, तर उष्माघाताने जमिनीवर अचानक पडल्याने जखमी झालेले आणि पंखाखाली पुरळ उठून हवेत तरंगण्यास असमर्थ ठरलेले विविध प्राणी व पक्षी प्रथमोपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या पक्ष्यांना जीवदान देण्याचे काम पक्षिमित्र आणि संबंधित संघटना करत आहेत.
उष्णतेचा कसा होतो परिणाम
तीव्र उष्णतेमुळे पक्ष्यांना वारेफोड्यासारखा आजार होत असून, यामुळे पक्षी आकाशात विहार करीत असतानाच जमिनीवर कोसळण्याचे प्रमाण वाढले आहेत. उष्णतेच्या लाटांमुळे नैसर्गिक अधिवासाचा नाश आणि अन्न आणि पाण्याची उपलब्धता कमी होणे आणि शहरी जागांमध्ये वाढ यामुळे पक्ष्यांवर अनेक प्रकारे परिणाम होत आहे. डिहायड्रेशन व्यतिरिक्त, वाढत्या उष्णतेमुळे प्रजनन आणि सामान्य आहार वर्तनावरदेखील परिणाम होत असल्याचे पक्षी अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे.
उन्हाळा वाढल्याने पक्ष्यांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. लोकांनी घराच्या गॅलरीत, गच्चीत किंवा इमारतीच्या भिंतीवर मीठ, साखर घातलेले पाणी एका भांड्यामध्ये ठेवले पाहिजे. हे पाणी त्यांना ताकद देण्यासाठी उपयोगी ठरेल.
- शिवाजी तळेकर, पशुवैद्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.