

‘सहयोग’ कला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, ता. ३१ : विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र आणत कला आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडवणाऱ्या ‘सहयोग कंटेम्पररी आर्ट एक्झिबिशन’ने यंदा दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले कला प्रदर्शन शुक्रवार (ता. २७) पासून सुरू झाले असून, येत्या गुरुवार (ता. २) पर्यंत प्रभादेवी येथील कलादालन आर्ट गॅलरीमध्ये कलारसिकांसाठी खुले असणार आहे.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिक कलाकारांसोबतच महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस, कायदा व सुव्यवस्था विभाग तसेच नागरी सेवांमधील अधिकारीही आपल्या कलाकृतींसह सहभागी झाले आहेत. कलाकार सत्येंद्र राणे यांच्या क्युरेशनखाली हे प्रदर्शन साकारले गेले आहे. उद्घाटन समारंभात उद्योग आणि न्याय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनी कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या भावनांचे महत्त्व अधोरेखित केले. कला ही केवळ व्यवसायापुरती मर्यादित नसून, ती व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंना अभिव्यक्ती देणारे प्रभावी माध्यम असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.
यंदाच्या प्रदर्शनाची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई पोलिस वेल्फेअर असोसिएशनसोबतची भागीदारी ठरली. प्रदर्शनातील कलाकृतींच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी दिला जाणार आहे. त्यामुळे कला आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून येतो. प्रदर्शनात अमूर्त, समकालीन, निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, मिश्र माध्यम तसेच शिल्पकला अशा विविध शैलीतील कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले असून, कला रसिकांना विविध अनुभव देणारा असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.