

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी परिसरातील वाधवा मिडोज् येथील डायमंड गृहसंकुलात भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद अधिकच तीव्र झाला आहे. एका भटक्या कुत्र्याला क्रूरपणे ठार मारल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता उर्वरित कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
प्राणीमित्र राजेंद्रकौर ऊर्फ हिर मंजितसिंग राजपूत (वय ४३) यांनी यासंदर्भात पुनित मल्होत्रा या रहिवाशाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, २५ तारखेला सकाळी एका मुलीला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर काही रहिवाशांनी संबंधित कुत्र्याला मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिकेला याची माहिती दिली असून, कुत्र्यांना पकडण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या.
दरम्यान, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी त्यांना केंद्रात पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, काही रहिवाशांनी कुत्र्यांना अन्यत्र सोडण्याची मागणी केली. खासगी निवारा केंद्रात ठेवण्याचा पर्यायही विचाराधीन होता; मात्र त्यासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने निर्णय लांबणीवर पडला. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत काही रहिवाशांनी विरोध दर्शवत वाद घातला. याच वेळी एका व्यक्तीने कुत्र्यांना अन्न देणार नसून त्यांना विष देण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्राणीमित्र आणि रहिवाशांमध्ये तणाव वाढला आहे. या प्रश्नावर प्रशासन आणि पोलिस कोणता मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.