

अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषद महिला व बालकल्याण विभाग तसेच बचत गटांच्या माध्यमातून प्रभाग २१ मध्ये महिला सक्षमीकरण प्रशिक्षण उपक्रम घेण्यात आला. नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या पुढाकाराने घेतलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध कौशल्याधारित मोफत प्रशिक्षणामुळे अनेक महिलांनी स्वावलंबनाकडे पहिले पाऊल या उपक्रमातून टाकले.
अंबरनाथ पूर्व येथील श्री शिव समर्थ व्यायामशाळा, गणपती मंदिर, कानसई येथे सोमवारी या प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. या वेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बचत गटांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. महिलांनी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकून व्यवसाय उभा करावा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावत समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे, या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे ज्योत्स्ना भोईर यांनी सांगितले.
याप्रसंगी नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे पाटील यांनी महिलांशी संवाद साधत महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. महिलांसाठी मोफत ड्रायव्हिंग क्लासेस तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी कराटे प्रशिक्षण सुरू करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
लघुउद्योगाला हातभार
उपक्रमांतर्गत महिलांना ब्युटी पार्लर, फॅन्सी कापडी पिशव्या तयार करणे, शिवणकाम, मेहंदी, भरतकाम यांसारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. लवकरच आरी वर्कचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय बचत गटांच्या माध्यमातून प्रभागात ५०० घरघंटी व ५०० शिवणकामाच्या मशीनचे वाटप करण्यात आले असून अनेक महिलांनी लघुउद्योग सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.