मुंबईकरांना ‘स्वच्छ हवेचा’ श्वास!

मुंबईकरांना ‘स्वच्छ हवेचा’ श्वास!
Published on

मुंबईकरांना ‘स्वच्छ हवेचा’ श्वास!
यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम एक्यूआय नोंद; ९० पैकी ४८ दिवस ‘असमाधानकारक’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईत मंगळवारी (ता. ३१) यंदाच्या वर्षातील सर्वात स्वच्छ हवा नोंदवली गेली असून, हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४१ इतका राहिला. हा आकडा ‘चांगली’ श्रेणीत येतो. तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे प्रदूषणाचे कण हवेत टिकू शकत नसल्याने सध्या वायू गुणवत्ता सुधारली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ अ‍ॅपवरील आकडेवारीनुसार, २०२६च्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या ९० दिवसांत तब्बल ४८ दिवस मुंबईतील एक्यूआय १००च्या पुढे गेला होता. म्हणजेच त्या काळात हवा ‘असमाधानकारक’ श्रेणीत होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नोंदवलेली सुधारणा दिलासादायक मानली जात आहे.
‘एन्व्हायरोकॅटॅलिस्ट्स’चे संस्थापक व प्रमुख विश्लेषक सुनील दहिया यांनी सांगितले, की प्रदूषणाचे स्रोत कमी झालेले नाहीत, मात्र अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे प्रदूषणाचे कण साचत नाहीत. त्यामुळे सध्या मुंबईची हवा स्वच्छ दिसत आहे. आता केवळ हवामानावर अवलंबून न राहता वाहतूक, बांधकाम, उद्योग आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांतील प्रदूषणाच्या स्रोतांवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे अन्यथा स्वच्छ हवेसाठी आपल्याला कायम निसर्गावर अवलंबून राहावे लागेल, असे मत त्‍यांनी व्यक्‍त केले.

प्रदूषण चिंताजनक; उपाययोजनांची गरज
‘एन्व्हायरोकॅटॅलिस्ट्स’चे संस्थापक व प्रमुख विश्लेषक सुनील दहिया म्हणाले, की मुंबईतील वाढते प्रदूषण हे केवळ हवामानामुळे नसून वाढत्या उत्सर्जनाचे परिणाम आहेत. हिवाळ्यात प्रदूषक घटक जमिनीच्या जवळ अडकून राहतात. मात्र जानेवारी-फेब्रुवारीतही प्रदूषणाची पातळी जास्त राहणे चिंताजनक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

विविध भागांतील एक्यूआय सुधारला
मंगळवारी पवई येथे एक्यूआय १८, कांदिवली (पश्चिम) २७, सायन, शिवडी व बोरिवली येथे २९, मालाड ३२, घाटकोपर आणि वरळी ३३, तर कुलाबा येथे ३४ असा एक्यूआय नोंदवला गेला. बहुतांश भागांमध्ये एक्यूआय ५०च्या खाली राहिला. तर कुर्ला येथे ७६, वांद्रा ६३ आणि कुलाबा येथे ७० एक्यूआय नोंदवण्यात आला.

तीन महिन्यांचा आढावा
जानेवारी : २३ दिवस एक्यूआय १०० पार
फेब्रुवारी : २१ दिवस एक्यूआय १०० पार
मार्च : ५ दिवस एक्यूआय १०० पार

एक्यूआय १०० पार झाल्यास धोका
एक्यूआय १००च्या पुढे गेल्यावर हवा ‘असमाधानकारक’ मानली जाते. अशा परिस्थितीत विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना त्रास होण्याची शक्यता वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com