

हनुमान जयंतीचा वाड्यात उत्साह
वाडा (बातमीदार)ः वाडा तालुक्यातील कुडूस, चांबळे, वाडा शहर, तुसे, कंचाड, हमरापूर, कोने, देवळी गावात हनुमान जयंती साजरी होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. घोणसई गावाला हनुमान जयंतीची १०० ते १२५ वर्षांची परंपरा आहे. यानिमित्त दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. २ एप्रिल रोजी सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत अभिषेक, आरती, दुपारी ४ ते ८ वाजेपर्यंत पालखी सोहळा, रात्री १० ते २ वाजेपर्यंत जय हनुमान नवतरुण नाट्य मंडळ घोणसई आयोजित कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी विनोदी तीन अंकी नाटक होणार आहे, तर पहाटे देवदेवतांची सोंगे (बोहाडा) होणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.