खालापूरात पेट्रोल पंपावर शुकशुकाट

खालापूरात पेट्रोल पंपावर शुकशुकाट
Published on

खालापुरात पेट्रोलपंपावर शुकशुकाट
पेट्रोल नसल्याने वाहनचालकांची धावाधाव
खालापूर, ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील २८ पैकी मोजक्याच पेट्रोलपंपांवर इंधन उपलब्ध असून, अनेक पंपांवर ‘पेट्रोल संपले’ असे फलक लावण्यात आल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाकडून युद्धाचा परिणाम जाणवणार नाही आणि पेट्रोल, डिझेल, गॅस वेळेवर मिळेल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
अनेक पेट्रोलपंपावर दुचाकीसाठी १०० रुपये चारचाकीसाठी ५०० रुपये पेट्रोल मर्यादा घालण्यात आली आहे. तर चार चाकीसाठी डिझेल हजार रुपयापर्यंत दिले जात आहे. सर्वात जास्त फटका दुचाकी चालकांना बसत असून, कामानिमित्त दररोज दुचाकी वापरणाऱ्या चालकांची केवळ १०० रुपयांच्या पेट्रोल मर्यादेमुळे अडचण झाली आहे.
खालापूर शहर हद्दीतील आणि पाताळगंगा बोरिवली येथील रिलायन्स पेट्रोलपंपावर आठवड्याच्या कामाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल शिल्लक नसल्याचे फलक लागल्याने कामावर जाणाऱ्या अनेकांची तारांबळ उडाली. दुचाकीमध्ये जेमतेम शिल्लक पेट्रोलच्या भरोशावर दुसरा पेट्रोलपंप शोधायची पाळी अनेक वाहनचालकांवर आली होती.

चौकट
तुटवड्यामुळे वाद
पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होणार आहे, या अफवेमुळे मागील आठवड्यात विनाकारण पेट्रोलपंपांवर झालेल्या गर्दीचा फटका नेहमी वापर असणाऱ्या कामगार, नोकरदार, व्यापारी यांना बसत आहे. खालापूर पेट्रोलपंपावर तेथील कामगार आणि वाहनचालकांमध्ये पेट्रोल कमी देण्यावरून वादाचे प्रसंग घडत आहेत.

कोट
प्रत्येक पेट्रोलपंप चालकाला १० टक्के शासकीय कोटा शिल्लक ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. एक तारखेपासून पेट्रोल, डिझेल साठा वाढणार आहे.
- मनोज पवार, पुरवठा अधिकारी, खालापूर तहसील


**फोटो - खालापुरातील पेट्रोलपंपावर पेट्रोल संपल्याने शुकशुकाट दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com