

स्वमग्नतेबाबत उपचारांची गुणवत्ता वाढण्याची गरज : समीर दलवाई
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : ऑटिझम अर्थातचं स्वमग्नता हा अलीकडे वेगाने वाढला असली तरी त्याच्या योग्य उपचारांमध्ये अजूनही तफावत आहे. ती दूर होणे गरजेचे असल्याचे मत जागतिक ऑटिझम जागरूकता दिवसानिमित्त बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी व्यक्त केले. स्वमग्न मुलांकडे पाहताना संतुलित व वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. प्रत्येक मूल वेगळे असते. त्यामुळे उपचार पद्धतीही विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच निवडण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले.
ऑटिझमला मलेरिया किंवा टायफॉइडसारखा आजार म्हणता येत नाही. हा मेंदूच्या विकासाशी संबंधित एक डेव्हलपमेंटल डिफरन्स आहे. मुलांच्या विकासातील काही टप्पे योग्य वेळी पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वर्तन आणि संवादात वेगळेपणा दिसतो, हे आपण पहिले समजून घेतले पाहिजे, असे डॉ. दलवाई यांनी सांगीतले. देशात विशेषतः शहरी आणि निमशहरी भागात ऑटिझमबाबतची जागरूकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेने उपचारांची गुणवत्ता वाढलेली नाही, असेही दलवाई यांनी नमूद केले.
समाज, सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रात विशेष मुलांबद्दलचा दृष्टिकोन सकारात्मक होत असल्याचे डॉ. दलवाई यांनी सांगितले. या मुलांच्या गरजा वेगळ्या असतात, मात्र अजूनही त्यांना पूर्णपणे आपण स्वीकारले नसल्याची खंत व्यक्त करीत उपचाराबद्दल जागरूकता वाढवण्याची आवश्यकता त्यांनी नमूद केली. विशेष मुलांना शाळेत पाठवण्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. मात्र तत्पूर्वी मूलभूत विकासाचे टप्पे पूर्ण होणे गरजेचे आहे. संवाद, वर्तन आणि सामाजिक समज या गोष्टी विकसित झाल्यानंतरच शालेय शिक्षणाचा खरा फायदा होतो, असे दलवाई यांनी सांगितले.
---------------
लक्षणे ओळखा
स्वमग्न मुलांचे लक्ष माणसांपेक्षा वस्तूंमध्ये जास्त असणे, नजरेचा संपर्क टाळणे, नावाने हाक मारल्यावर प्रतिसाद न देणे, इशारे, हातवारे समजण्यात अडचणी, बोलण्यात उशीर, एकाच कृतीची पुनरावृत्ती ही ऑटिझमची सामान्य लक्षणे आहेत. माणसांपेक्षा वस्तूंमध्ये अधिक रमणे हे सुरुवातीचे प्रमुख लक्षण आहे.
-------------
सामाजिक वातावरण
मुलांच्या विकासासाठी केवळ मेंदूच नव्हे, तर सामाजिक वातावरणही महत्त्वाचे असते. आजच्या काळात मुलांचे सामाजिक संवाद कमी झाले आहेत. मोबाईल, टॅबलेटसारख्या साधनांचा अतिवापराचा परिणाम मुलांच्या विकासावर होत असल्याचे काही संशोधनातून दिसून येत असल्याचे डॉ. दलवाई यांनी सांगितले.