१४ वर्षांपासून जीवघेणा प्रवास

१४ वर्षांपासून जीवघेणा प्रवास
Published on

१४ वर्षांपासून जीवघेणा प्रवास
डहाणू लोकलचे विस्तारीकरण रखडले, प्रवासी त्रस्त

पालघर, ता. १ ः वैतरणा ते डहाणू भागात लोकलसेवा विस्तारासाठी किंवा सेवा वाढविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने उपनगरीय रेल्वेसेवेचा भाग असलेल्या डहाणू लोकल सेवेच्या विस्ताराअभावी दुर्लक्षित राहिली आहे. त्यामुळे १४ वर्षांपासून रेल्वे प्रवासी दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.
पालघर जिल्हा स्थापन होऊन बारा वर्षे होत आहेत. जिल्हा स्थापनेनंतर प्रचंड नागरीकरण वाढले आहे. वसई-विरार गजबजल्याने नागरिकांचा ओढा पालघर शहराकडे वाढला आहे. परिणामी, लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने लोकसंख्येला रेल्वे सेवांवर प्रचंड ताण पडत आहे. डहाणूहून सुटणारी लोकल बोईसरमध्येच गच्च भरू लागली आहे. त्यामुळे पुढच्या स्थानकापासून रेल्वे प्रवासी दाटीवाटीने प्रवास करीत आहेत. या दाटीवाटीचा महिलावर्गाला मोठा सामना करावा लागत आहे.
----------------------------------
सुरक्षेचा प्रश्न गंभीर
- सकाळ, सायंकाळी डहाणू- विरारदरम्यानच्या लोकलमध्ये अक्षरशः पाय ठेवायला जागा नसते. अनेकदा प्रवाशांना जीव धोक्यात घालून दरवाजात उभे राहून प्रवास करावा लागतो. महिलांसाठी राखीव डब्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
- काही वर्षांत नवीन गाड्या वाढवण्याची मागणी वारंवार करण्यात आली. स्थानिक प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला असला, तरी ठोस उपाययोजना अद्याप दिसून आलेल्या नाहीत. परिणामी, वाढत्या प्रवासी सेवेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
---------------------------------
वैतरणा, डहाणू दुर्लक्षित
डहाणू-विरार सेवा मर्यादित राहिली आहे. रेल्वे प्रशासन नेहमी दुजाभाव करीत असल्याचे आरोप रेल्वे प्रवासी संघटना करीत आहेत. फेब्रुवारीमध्ये काही लोकल सेवा विरारपर्यंत वाढवल्या. तर मार्चमध्ये १२ डब्यांच्या १६ लोकल १५ डब्यांत परावर्तित करण्यात आल्या; मात्र या दोन्ही बदलांमध्ये वैतरणा, डहाणू भागाकडे दुर्लक्ष झाले आहे.
-----------------------------------
१३ वर्षांत पाच फेऱ्यांची वाढ
डहाणू लोकल सुरू झाली. सुरुवातीला १० अप व १० डाऊन फेऱ्या सुरू होत्या. त्यातील नऊ अप व नऊ डाऊन पूर्णपणे नवीन फेऱ्या होत्या, तर एक फेरी डहाणू शटलची फेरी बंद करून केली होती. आज डहाणू लोकलच्या २१ अप व २१ डाऊन अशा फेऱ्या होत असल्या तरी काही फेऱ्या मेमू, डीएमयू गाड्या बंद झाल्याने फक्त पाच फेऱ्या वाढल्या आहेत.
-----------------------------------
रेल्वेकडून उपेक्षा
डहाणू लोकल सुरू होण्याआधी मेमूच्या फेऱ्या वाढवण्यासाठी मागणी होत होती. त्या वेळी पथ उपलब्ध नाही, १३६.६% अतिरिक्त प्रवासी भार आहे, अशी उत्तरे रेल्वे प्रशासन देत होते. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल होताच १६ एप्रिल २०१३ला डहाणू लोकल सुरू झाली. त्या वेळी २० फेऱ्या सुरू झाल्या होत्या. आताही स्तरावरून डहाणू विभागात मेमू, शटल, लोकलची मागणी असता पथ उपलब्ध नाही, १४२% अतिरिक्त प्रवासी भार असल्याचे कारण रेल्वेकडून दिले जात आहे.
--------------------------------
डहाणूहून मुंबई (अप)
पहाटे ३.५०
सकाळी ७.४०
संध्याकाळी ४.४५
संध्याकाळी ६.१५
रात्री ११.३०
---------------------------------
विरारहून डहाणू (डाऊन)
सकाळी ७.३०
दुपारी २.३०
संध्याकाळी ५.३०
रात्री ८.००
रात्री १०.१५
-----------------------------------
प्रवासी संघटनेचे म्हणणे
प्रवासीवर्गाच्या सोयीसाठी डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्यातरी वेळापत्रकात दोन्ही बाजूंकडे पाच फेऱ्या वाढविणे आवश्यक आहे, असे डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com