

पुनर्वसित गावांतील शाळा उभारणीचा प्रश्न
२७ गाव प्रकल्पग्रस्तांकडून जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांना निवेदन
पनवेल, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसित गावांमध्ये शाळा उभारणीचा प्रश्न गंभीर बनला आहे. १० वर्षे उलटली तरीही शाळांचे काम पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर २७ गाव प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, कोंबडभुजे, तरघर, गणेशपुरी आदी गावांतील पुनर्वसन क्षेत्रात नवीन शाळांची उभारणी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे संविधानाने दिलेल्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचे निवेदनात नमूद आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक गावात पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची सोय असलेली सुसज्ज शाळा उभारणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत किमान १८ खोल्या, स्वतंत्र मुख्याध्यापक कक्ष, ग्रंथालय, संगणक कक्ष, तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. भविष्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा सुरू करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी केली. वरचे ओवळे पुनर्वसन क्षेत्रात शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना दूर जावे लागत असून, त्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या वेळी संस्थेच्या वतीने अध्यक्ष नंदराज मुंगाजी, सचिव प्रेम पाटील, कार्याध्यक्ष रुपेश धुमाळ, रवींद्र पाटील, मनखुश नाईक, अनिल केणी, रोशन घरत, अमित मढवी व इतर सदस्य उपस्थित होते. मंगेश वाकडीकर यांनी याप्रश्नी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे संस्थेच्या वतीने सांलितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.