मालमत्ता कर वसुलीत ऐतिहासिक झेप

मालमत्ता कर वसुलीत ऐतिहासिक झेप
Published on

वाशी, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ८७६ कोटींची विक्रमी मालमत्ता करवसुली करून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून एका आर्थिक वर्षात झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली ठरली असून, शहराच्या आर्थिक बळकटीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले की, पारदर्शकता, सुलभता आणि तंत्रज्ञानाधारित सेवा या तत्त्वांवर भर दिल्यामुळे करदात्यांमध्ये विश्वास निर्माण झाला. नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाची बांधिलकी यामुळेच ही विक्रमी वसुली शक्य झाली आहे. यंदा एकूण दोन लाख २५ हजार ५७६ मालमत्ताधारकांनी कर भरला असून, त्यापैकी सुमारे ६१ टक्के नागरिकांनी ऑनलाइनचा अवलंब केला. डिजिटल देयक प्रणालीचा वाढता वापर हा महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमांना मिळालेल्या यशाचे द्योतक मानले जात आहे. उर्वरित ३९ टक्के नागरिकांनी पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने कर भरला.

मालमत्ता कर विभागाने अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या नेतृत्वाखाली वसुलीसाठी विविध अभिनव उपाययोजना राबवल्या. यामध्ये ऑनलाइन पेमेंट पोर्टल, मोबाईल ॲप, एसएमएस सूचना, व्हॉट्सॲप मेसेज, ई-मेल अलर्ट तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे जनजागृती यांचा समावेश होता. या सर्व माध्यमांमुळे करदात्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे शक्य झाले.

महापालिकेने करवसुलीत डेटा विश्लेषणाचा वापर करून मालमत्ताधारकांचे वर्गीकरण केले आणि त्यानुसार लक्ष केंद्रित मोहीम राबवली. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॉलिंग प्रणालीच्या सहाय्याने थकबाकीदारांशी थेट संपर्क साधून त्यांना कर भरण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय आरसीएस एसएमएस, समाजमाध्यमांवर मोहिमा आणि डिजिटल जनजागृती उपक्रमांमुळे कर भरण्याबाबत जागरूकता वाढली. या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिणाम म्हणून गेल्या दोन वर्षांपासून करवसुलीत सातत्याने वाढ होत असून, यंदा ती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या उत्पन्नामुळे महापालिकेला पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सेवांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास मदत होणार आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मालमत्ता कर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

तंत्रज्ञानाधारित वसुलीमुळे गती
महापालिकेने डेटा विश्लेषण, डिजिटल कम्युनिकेशन आणि एआय आधारित कॉलिंग प्रणालीचा प्रभावी वापर करत करवसुली प्रक्रियेला वेग दिला. एसएमएस, व्हॉट्सॲप, समाजमाध्यम, आरसीएस प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत सातत्याने संपर्क साधण्यात आला. त्यामुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान झाली आहे.

योजनेला प्रतिसाद
या यशामागे करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रभावी नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशासनाची सातत्यपूर्ण पाठपुरावा मोहीम हे प्रमुख घटक ठरले. १० मार्च ते ३१ मार्च २०२६ दरम्यान राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनेमुळे थकबाकीदारांनी मोठ्या प्रमाणात कर भरण्यास पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, नोकरदारवर्ग व सर्वसामान्य नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी मार्चमध्ये शनिवार-रविवार, तसेच सार्वजनिक सुट्ट्यांमध्येही कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. यामुळे शेवटच्या टप्प्यात वसुलीला मोठी चालना मिळाली.


करदाते २,२५,५७६
ऑनलाइन ६१ टक्के
ऑफलाइन ३९ टक्के

प्रभागनिहाय मालमत्ता करवसुली (कोटींमध्ये)
नेरूळ १८२.९ कोटी
कोपरखैरणे १६३.४० कोटी
घणसोली १५०.११ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com