

निरक्षरतेवर मात करून समाजाला दिशा
वच्छला लिखार यांचे देहदान ठरले प्रेरणेचे दीपस्तंभ
डोंबिवली, ता. २ : औपचारिक शिक्षणाचा गंध नसतानाही सामाजिक जाण आणि प्रगल्भ विचारांची उंची गाठता येते, याचा प्रत्यय कल्याणमध्ये पाहायला मिळाला आहे. वच्छला चंद्रभान लिखार (वय ९१) यांनी मृत्यूनंतर देहदान करून समाजासमोर एक अत्यंत प्रभावी आदर्श ठेवला आहे.
ग्रामीण पार्श्वभूमीत आयुष्य व्यतीत केलेल्या लिखार यांना देहदानाचे महत्त्व त्यांच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भाचीमुळे समजले होते. त्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता देहदानाचा धाडसी निर्णय घेतला. मृत्यूनंतर आपल्या शरीराचा उपयोग वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्हावा, याहून मोठे दान नाही, अशी त्यांची ठाम भूमिका होती. कुटुंबाच्या पूर्ण पाठिंब्याने त्यांनी पाच वर्षांपूर्वीच देहदानाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती. २८ मार्च रोजी वृद्धापकाळाने वच्छला लिखार यांचे निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार, पारंपरिक अंत्यसंस्कार न करता त्यांचे पार्थिव नागपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले.
सामाजिक भान
देहदानामुळे पारंपरिक अस्थी उपलब्ध नसल्याने, रुग्णालयाकडून मिळालेल्या केस आणि नखांच्या माध्यमातून कुटुंबीयांनी प्रतीकात्मक विधी पार पाडले. पवनी येथील ‘विदर्भ काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीकाठी हे विधी करण्यात आले. विशेष म्हणजे, ‘तेराव्याचा खर्च वृद्धाश्रमाला द्यावा’ ही त्यांची इच्छा असून, कुटुंबीय ती पूर्ण करणार आहे. औपचारिक शिक्षण नसतानाही सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणाऱ्या वच्छला लिखार यांच्या या निर्णयामुळे देहदानाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.