मुरबाड बाजारात ‘तोरण’ची गोड रेलचेल

मुरबाड बाजारात ‘तोरण’ची गोड रेलचेल
Published on

गोड-तुरट चवीच्या ‘तोरण’ची भुरळ
रानमेव्यामुळे आदिवासींना मिळाला रोजगार
सुधाकर वाघ : सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. २ : मुरबाड तालुक्यात सध्या सह्याद्रीच्या जंगलातून मिळणाऱ्या ‘तोरण’ या रानमेव्याचा हंगाम बहरात आला आहे. टोकावडे, धसई, म्हसा यांसह मुरबाडच्या साप्ताहिक बाजारपेठांमध्ये आदिवासीबांधव टोपल्यांमधून तोरण विक्रीसाठी आणत असून, या नैसर्गिक फळाला ग्राहकांकडून मोठी मागणी मिळत आहे.

नैसर्गिक वातावरणात वाढणारे हे छोटे, पांढरट-गुलाबी रंगाचे फळ त्याच्या गोड-तुरट चवीमुळे सर्वांच्या पसंतीस पडत आहे. हा रानमेवा मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध होत असल्याने तो खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे. पळसाच्या पानात १० रुपये प्रति ''वाटा'' याप्रमाणे याची विक्री होत आहे.

आदिवासींचा आर्थिक आधार
मार्च ते मे या कालावधीत मिळणारे हे फळ ग्रामीण आणि आदिवासीबांधवांसाठी रोजगाराचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. जंगलातील ही नैसर्गिक संपत्ती स्थानिकांच्या उपजीविकेला मोठा आर्थिक आधार देत असल्याचे समाधानकारक चित्र सध्या मुरबाडमध्ये दिसत आहे.

वाढत्या वृक्षतोडीमुळे झाडांची घट
तोरणाचे झाड काटेरी स्वरूपाचे असते. मात्र, जंगलांना लागणारे वणवे आणि वाढती वृक्षतोड यामुळे या झाडांची संख्या झपाट्याने घटत चालली आहे. भविष्यात हे चविष्ट फळ दुर्मिळ होण्याची भीती आदिवासीबांधवांनी व्यक्त केली असून, वनसंपदेचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

बियांचाही होतो उपयोग
तोरणाच्या बिया उन्हात सुकवून तव्यावर भाजल्यानंतर त्या डाळीप्रमाणे चविष्ट लागतात. त्यामुळे केवळ फळच नाही, तर त्याच्या बियांचाही मोठ्या आवडीने आस्वाद घेतला जातो. निसर्गाच्या या गोड भेटीमुळे सध्या मुरबाडच्या बाजारपेठांना एक वेगळाच ग्रामीण साज चढला असून, नागरिक पारंपरिक रानमेव्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com