

कर संकलनात प्रशासन अपयशी
उल्हासनगर पालिकेची ८०० कोटींची थकबाकी; खासगी संस्था नेमूनही वसुली ५४ टक्क्यांवरच
उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका मालमत्ता करवसुलीच्या बाबतीत पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्रशासनाने ठेवलेल्या ११४.१० कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी प्रत्यक्षात केवळ ७६.६० कोटी रुपयांचीच वसुली होऊ शकली आहे. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या शहरात स्वतःचा हक्काचा कर वसूल करताना प्रशासनाला घाम फुटत असल्याचे चित्र आहे.
शहरातील सुमारे एक लाख ३० हजार मालमत्ताधारक थकबाकीदार असून, एकूण थकबाकीचा आकडा तब्बल ८११ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. या अवाढव्य थकबाकीतून महापालिकेला केवळ २९.७८ कोटी रुपये वसूल करता आले आहेत, जे एकूण थकबाकीच्या फक्त ३.६७ टक्के इतकेच आहे. थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी ''अभय योजना'' राबवून आणि जनजागृतीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करूनही अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही.
चालू वर्षाच्या करातही घसरण
यंदाच्या आर्थिक वर्षासाठी ८६ कोटी रुपयांचा चालू कर (डिमांड) आकारण्यात आला होता. त्यापैकी केवळ ४६.८२ कोटी रुपये वसूल झाले असून, हे प्रमाण अवघे ५४.४४ टक्के आहे. उर्वरित वसुली ही जुन्या थकबाकीतून झाली आहे. महापालिकेच्या तिजोरीची अवस्था बिकट होत असताना प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुढील वर्षाचे लक्ष्य आव्हानात्मक
मागील वर्षातील अपयश पदरी असतानाच, आगामी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी महापालिकेने १३९.१० कोटी रुपयांचे नवीन आणि अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, थकबाकीदारांवर कठोर कारवाई आणि प्रभावी नियोजनाशिवाय हे लक्ष्य गाठणे प्रशासनासाठी मृगजळच ठरेल, अशी चर्चा शहरात सुरू आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि कर भरण्याकडे नागरिकांची पाठ, यामुळे उल्हासनगरच्या विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वसुलीचा लेखाजोखा
तपशील आकडेवारी (कोटीत)
निश्चित केलेले उद्दिष्ट ११४.१० कोटी
प्रत्यक्ष झालेली वसुली ७६.६० कोटी
चालू वर्षाचा कर (डिमांड) ८६.०० कोटी
चालू करवसुली ४६.८२ कोटी
थकबाकीतून झालेली वसुली २९.७८ कोटी
शहरातील एकूण थकबाकी ८११ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.