

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : उल्हासनगर जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन आठ ते दहा दिवसांपासून बंद असल्यामुळे हजारो गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांना उपचारासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रुग्णांच्या वेदना आणि संताप दोन्ही टोकाला पोहोचले आहेत.
उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन आठ ते दहा दिवसांपासून बंद असल्याची तक्रार मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांच्याकडे रुग्णांनी केली होती. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा रुग्णालयातील मूलभूत वैद्यकीय सुविधा ठप्प असणे ही गंभीर बाब असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये तपासण्या करणे परवडत नसल्यामुळे अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहत आहेत.
दररोज उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, कर्जत, कसारा व ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून हजारो रुग्ण येथे येतात. मात्र, डॉक्टरांची अपुरी संख्या, ओपीडीतील वाढती गर्दी आणि सुविधांचा अभाव यामुळे रुग्णांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही डॉक्टरांकडून रुग्णांना अन्य जिल्ह्यांत पाठवण्याचे प्रकारही घडत आहे. रुग्णालयात तत्काळ एमआरआय सुविधा सुरू करण्यासह विविध मागण्या मनसेने केेल्या आहेत. प्रशासनाने त्वरित उपाययोजना न
केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
सीटी स्कॅन मशीन ही अत्यावश्यक सेवा बंद असल्याने गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांची दारे ठोठवावी लागतात. प्रशासनाने तत्काळ सर्व सेवा सुरू कराव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- बंडू देशमुख, मनसे, जिल्हाध्यक्ष
रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन खूप जुनी झाली असून, तिचे काही भाग खराब झाले आहेत. ते पार्ट बाजारात उपलब्ध होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात येईल.
- डॉ. मनोहर बनसोडे, अधीक्षक, जिल्हा रुग्णालय
प्रमुख मागण्या
* सीटी स्कॅन सेंटर तत्काळ सुरू करणे
* सोनोग्राफी सेवा नियमित सुरू करणे
* पॅथॉलॉजी विभाग सुसज्ज करणे
* एमआरआय केंद्र लवकर सुरू करणे
* डॉक्टर व ओपीडी संख्या वाढवणे
* किमान तीन रुग्णवाहिका व एक शववाहिनी उपलब्ध करणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.