

पनवेल, ता. २ (बातमीदार) : कोरळवाडी व दाभोळवाडी येथील मंजूर अंगणवाडी इमारतींचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, तसेच कोरळवाडीतील बंद प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करावी या मागण्यांसाठी नागरिकांनी बुधवार (ता. १)पासून पनवेल पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पनवेल तालुक्यातील कोरळवाडी आणि दाभोळवाडी या आदिवासीवाड्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून, प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. रस्ता व पिण्याच्या पाण्यासाठी या भागातील रहिवाशांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. गेल्या वर्षी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असली तरी इतर मूलभूत प्रश्न अद्याप प्रलंबितच आहेत.
कोरळवाडी व दाभोळवाडी येथे सुमारे नऊ महिन्यांपूर्वी अंगणवाडी इमारतींच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, वन विभागाकडून जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने संबंधित ठेकेदाराने अद्याप काम सुरू केलेले नाही. त्यामुळे बालकांना सुरक्षित व आवश्यक सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याशिवाय कोरळवाडी येथील प्राथमिक शाळा सरकारने बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन
लहान मुलांना शिक्षणासाठी दूरवर जावे लागत असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या सर्व प्रश्नांबाबत यापूर्वी प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर स्थानिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.