आता दादर-रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस वसईवरून धावणार

आता  दादर-रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस वसईवरून धावणार
Published on

रत्नागिरी पॅसेंजर वसईवरून धावणार!
स्थानकाचा टर्मिनल म्हणून विकास होणार

विरार, ता. २ (बातमीदार) ः काही काळापासून बंद असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी काही दिवसांपासून केली जात होती; मात्र खासदार रवींद्र वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाडीचा विस्तार दादरपर्यंत करण्याऐवजी ती थेट वसईमार्गे चालवली जाणार आहे. तर भविष्यात सर्वच कोकण रेल्वेंचा मार्ग बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता वसई स्थानक हे टर्मिनलच्या रूपात विकसित करण्यात येणार आहे.
गेल्या चार वर्षांपासून दादर-रत्नागिरी गाडी बंद करण्यात आली होती. ही गाडी आता फक्त दिवा स्थानकापर्यंत चालवली जाते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिवा स्थानक गाठावे लागते. मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवा सोयीचे नसल्यामुळे दिवा-रत्नागिरी गाडीचा विस्तार दादर किंवा सीएसएमटी स्थानकापर्यंत करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. तसेच यावरून राजकीय वाददेखील निर्माण झाला होता. मनसेने याविरोधात आवाज उठवल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना सांगितले, की रेल्वेमंत्र्यांना रत्नागिरी-दादर किंवा सीएसएमटी अशा गाड्या सुरू करण्याच्या मागणीचे पत्र दिले होते; मात्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अशी सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे सांगितले. तसेच भविष्यात कोकणात जाणाऱ्या गाड्या आता थेट पश्चिम रेल्वे मार्गावरून वसई-जूचंद्रमार्गे कोकणात जाणार असल्याची माहितीही खासदार वायकर यांनी दिली. पुढे ते म्हणाले, की मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर या स्थानकांतील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी जोगेश्वरी जंक्शनचे काम केले जात आहे. तर जून महिन्यापासून जोगेश्वरी जंक्शन सुरू केले जाईल. तसेच येत्या एक ते दोन वर्षांत नायगाव ते जूचंद्रदरम्यान नव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले जाईल. त्यामुळे भविष्यात कोकण रेल्वेसह २४ रेल्वे गाड्या या मार्गावरून धावतील. त्यामुळे प्रवाशांना नवीन मार्ग मिळणार आहे. यात राजकारण आणू नये. नवीन मार्ग तयार करण्यासाठी एक ते दोन वर्षांचा वेळ लागणार आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
=====================================
रेल्वेच्या या नव्या नियोजनानुसार, कोकणात जाणाऱ्या गाड्या आता पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी जंक्शनवरून सुटून बोरिवलीमार्गे जूचंद्र, कामण रोड, खारबाव, डुंगे, भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, नांदवली, तळोजे आणि कळंबोली या मार्गाने पनवेलला पोहोचतील आणि तिथून पुढे या गाड्या कोकणाच्या दिशेने धावतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com