

गोमांसप्रकरणी चार जण ताब्यात
खालापूर, ता. २ (बातमीदार) ः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बंद पडलेल्या एका पिकअपमध्ये सुमारे १,६०० किलो गोवंश जातीच्या जनावराचे मांस सापडल्याची घटना गुरुवारी (ता. २) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चार जणांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी पहाटे हेल्पलाइनवर यासंदर्भात पोलिसांना खबर मिळाली. त्या वेळी फूडमाॅलनजीक नादुरुस्त पिकअप आढळली. तपासणी केली असता गोवंश जनावराचे मांस आढळले. पिकअपचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांना जवळच असलेल्या कारमधील चौघांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांचा यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी पिकअप, दोन कारसह चौघांना ताब्यात घेतले. सुमारे एक लाख ६८ हजार रुपये किमतीचे गोवंश जातीच्या जनावराचे मांस असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन हिरे करीत आहेत.