

युद्धाचा अंबरनाथच्या उद्योगांना फटका
उत्पादन घटले, कामगारांचे स्थलांतर सुरू
अंबरनाथ, ता. ३ (वार्ताहर) : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम अंबरनाथच्या औद्योगिक क्षेत्रावर झाला असून, इंधन टंचाई आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे लघु व मध्यम उद्योग संकटात सापडले आहेत. उत्पादनात निम्म्याने घट झाल्याने कारखान्यांची चक्रे मंदावली आहेत. दुसरीकडे, घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने कामगारांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली असून, उद्योगांसमोर मनुष्यबळाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील (अॅडिशनल एमआयडीसी) स्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. ‘अॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’चे अध्यक्ष उमेश तायडे यांनी यासंदर्भात ठाणे जिल्हा उद्योग केंद्राला निवेदन दिले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आयात-निर्यात साखळी विस्कळित झाली असून उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. मंदीच्या या सावटातून उद्योगांना बाहेर काढण्यासाठी पुढील तीन ते सहा महिने वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) सवलत द्यावी, तसेच बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
उदरनिर्वाहाचे संकट
औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे हालही वाढले आहेत. तात्पुरत्या निवाऱ्यात राहणारे कामगार स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरवर अवलंबून असतात; मात्र पुरवठा अनियमित झाल्याने आणि कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे नवीन जोडणी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. वाढती महागाई आणि कामाची अनिश्चितता यामुळे अनेक कामगारांनी कुटुंबासह स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासकीय हस्तक्षेपाची मागणी
संकटकाळात शासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा. तसेच, उद्योजक आणि कामगारांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ठोस धोरण राबवावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.