

दिवा परिसरातील नियोजनबद्ध विकासाला ब्रेक
शिळ भागातील अनधिकृत गोडाऊनची घरघर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ठाणे महापालिका क्षेत्रात विशेषतः दिवा-शिळ रस्ता, भारत गिअर ते पोलिस ठाणे आणि दिवा पूल ते शिळफाटा या परिसरात काही वर्षांत अनधिकृत गोदामाचे पेव फुटले आहे. २०२२ ते २०२६ या प्रशासकीय राजवटीच्या काळात या अनधिकृत बांधकामांमध्ये प्रचंड वाढ झाली. यामुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. नगरसेविका अर्चना पाटील यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
दिवा प्रभागात हजारोंच्या संख्येने पत्र्याची मोठी गोदामे उभी राहिली आहेत. ही बांधकामे करताना कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्यास पालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. या गोदामामधून कोणत्या प्रकारचे व्यवसाय चालतात, याची कोणतीही नोंद प्रशासनाकडे नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यांना व्यावसायिक ‘मालमत्ता कर’ भरावा लागतो का, याची माहिती पालिका प्रशासनाने अद्याप संबंधित लोकप्रतिनिधींना दिलेली नाही. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर मोठा दरोडा पडत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. उत्पन्नाचा हा मोठा स्रोत अनधिकृत धंद्यांमुळे आटला आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये ज्वलनशील पदार्थांची साठवणूक किंवा अनधिकृत कारखाने चालवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियोजनशून्य पद्धतीने बांधलेली ही गोडाऊन आगीच्या घटनांना निमंत्रण देत आहेत.
अग्निशमन दलाला अडथळा
अरुंद रस्ते आणि दाटीवाटीने बांधलेली ही बांधकामे यामुळे आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचणे कठीण होते.
सुरक्षेचा अभाव
कोणत्याही ‘फायर ऑडिट’शिवाय चालणाऱ्या या गोडाऊनमुळे आजूबाजूच्या निवासी क्षेत्रालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
......................................
स्वच्छ व सुंदर शहराच्या क्रमवारीत घसरणीची भीती
ठाणे शहराने स्वच्छतेच्या बाबतीत ३५व्या क्रमांकावरून १५व्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे; मात्र दिवा परिसरातील हे अनियंत्रित आणि विद्रूप पत्र्याचे साम्राज्य शहराच्या सौंदर्याला बाधा आणत आहे. जर या अनधिकृत बांधकामांवर वेळीच कारवाई झाली नाही, तर शहराच्या क्रमवारीत पुन्हा घसरण होण्याची भीती नगरसेवक बाबाजी पाटील यांनी याआधीच व्यक्त केली आहे.
प्रशासकीय उदासीनता?
अर्चना पाटील यांनी १६ मार्चला यासंदर्भात सहाय्यक आयुक्तांना पत्र दिले होते; मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.