महापालिका शाळांचा बदलणार चेहरामोहरा

महापालिका शाळांचा बदलणार चेहरामोहरा
Published on

वाशी, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे ‘शिक्षण रूपांतर धोरण २०२६’ महासभेत मंजूर करण्यात आले आहे. यामुळे शहरातील महापालिका शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सभागृह नेते सागर नाईक यांनी बुधवारी (ता. १) झालेल्या महासभेत मांडलेला प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला. या धोरणामुळे पालिका शाळांची गुणवत्ता उंचावण्याबरोबरच ४८ हजार विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाशी जोडण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

शहरातील महापालिकेच्या एकूण ८० शाळांपैकी ५६ प्राथमिक शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग इंग्रजी माध्यमातून सुरू होणार आहेत. तसेच शहरातील अन्य शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचे धोरण महापालिकेने आखले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी, हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी मराठी भाषेचे स्थान अबाधित ठेवत तिच्या संवर्धनासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आगामी शैक्षणिक वर्षापासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. बालवाडीपासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली असून, लहान वयातच विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी महापौर सुजाता पाटील यांनी माहिती दिली.

सरसकट इंग्रजीकरणाला विरोधकांचा विरोध
या धोरणावरून महासभेबाहेरही राजकीय वातावरण तापले. विशेष महासभेपूर्वी मनसे व शिवसेना (ठाकरे गट) नगरसेवकांनी पालिका मुख्यालयात घोषणाबाजी करत प्रवेश केला. मराठी शाळांचे सरसकट इंग्रजीकरण करण्यास विरोध असून हा निर्णय महापालिका शिक्षण व्यवस्थेच्या खासगीकरणाकडे नेणारा असल्याचा दावा त्यांनी केला.

मूलभूत सुविधा सुधाराव्यात
सेमी-इंग्रजीसारखे पर्याय विचारात घ्यावेत, अशी मागणीही विरोधकांनी केली. महासभेतील चर्चेदरम्यानही विरोधकांनी शाळांमधील मूलभूत सुविधांची स्थिती सुधारण्याला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच इंग्रजी माध्यमाचा विस्तार करण्यापूर्वी शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक पद्धतीतही बदल करण्यात येणार आहेत. चौथी आणि सातवीमध्ये बुद्धिमत्ता चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांची क्षमता व आवड ओळखली जाणार असून, त्यानुसार पुढील शैक्षणिक दिशा ठरवली जाईल. सातवीपासून कौशल्याधारित शिक्षणाचा समावेश करत रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक विषयांना अभ्यासक्रमात स्थान दिले जाणार आहे. तसेच क्रीडा व शारीरिक विकासालाही धोरणात महत्त्व देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com