

एमआयडीसीत रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटली
उग्र दर्पामुळे नागरिक हैराण
डोंबिवली, ता. ३ : औद्योगिक क्षेत्रातील निष्काळजीचा आणखी एक गंभीर फटका स्थानिक नागरिकांना बसला आहे. के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाजवळ रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी गुरुवारी (ता. २) रात्री अचानक फुटल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली. या घटनेमुळे एमआयडीसी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या गटाराच्या कामादरम्यान यंत्रसामग्रीचा धक्का लागल्याने ही वाहिनी फुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशिरा वाहिनी फुटल्याने रासायनिक सांडपाणी थेट रस्त्यावर आणि नाल्यांमध्ये वाहू लागले. यामुळे परिसरात उग्र वास पसरला असून, काही वाहनचालकांना या साचलेल्या दूषित पाण्यातून मार्ग काढावा लागला. यामुळे वाहनांचे इंजिन बिघडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे अधिकारी आणि दुरुस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सांडपाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने असल्याने तातडीने दुरुस्ती करणे कठीण झाले होते. अखेर पहाटे अडीचच्या सुमारास प्रवाह नियंत्रित केल्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
वारंवार होणाऱ्या चुकांमुळे संताप
याच परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे यापूर्वीही महानगर गॅस आणि महावितरणच्या भूमिगत वाहिन्यांचे नुकसान झाले होते. परिणामी, मिलापनगर आणि जिमखाना परिसरातील नागरिकांना तासन्तास अंधारात आणि गॅसविना राहावे लागले होते. ऐन उन्हाळ्यात मूलभूत सेवांचा बोजवारा उडत असल्याने ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आंदोलनाचा इशारा
ठेकेदारांची निष्काळजी वारंवार समोर येत आहे. प्रशासनाने यावर वेळीच कठोर कारवाई केली नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मिलापनगरचे स्थानिक रहिवासी डॉ. मंगेश पाटील यांनी दिला आहे.