

आगोटीच्या तयारीला गृहिणींची सुरुवात
आठवडा बाजारात गर्दी; सुक्या मासळीलाही मागणी
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) ः मान्सून सुरू होण्यास अद्याप दोन महिने शिल्लक असून आगोटीच्या तयारीला गृहिणींनी सुरुवात केली आहे. यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील विविध आठवडा बाजारांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. सुकी मासळी, मसाले आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीला उधाण आले आहे.
सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून मसाला, पापड, लोणची, इतर वाळवणे करण्यात महिला वर्ग व्यस्त झाला आहे. यासोबतच आगोटीच्या तयारीलही गृहिणींकडून सुरुवात झाली आहे. रामराज, पोयनाड, नागाव, सहाण आणि वायशेत येथील आठवडा बाजार हे सर्वात मोठे मानले जातात. कांदा, लसूण, बटाटे, खोबरे, विविध कडधान्ये आणि सुक्या मच्छीच्या खरेदीसाठी येथे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईच्या वाशी बाजारपेठेप्रमाणेच येथेही घाऊक व स्वस्त भावात वस्तू किरकोळ प्रमाणात उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा ओढा वाढला आहे.
सुक्या मासळीला मोठी मागणी
पावसाळ्यात समुद्र आणि खाडीत मासेमारीवर निर्बंध येत असल्याने कोळीबांधवांना मासळी पकडण्यासाठी जाता येत नाही. परिणामी, ताज्या मच्छीचा पुरवठा कमी होतो आणि खवय्यांना सुक्या मच्छीवरच समाधान मानावे लागते. यामुळे पावसाळ्यापूर्वी सुक्या मच्छीची मोठ्या प्रमाणात साठवण करण्याची परंपरा आहे. अलिबाग तालुक्यातील वडखळ येथील आठवडा बाजार हा सुक्या मच्छीसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. या बाजारात अलीकडेच सुक्या मच्छीची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे दिसून आले.
मसाल्याच्या मिरची खरेदीला वेग
उन्हाळ्याला सुरुवात होताच सर्वच घरात महिला वर्गाची मसाले तसार करण्याची लगबग सुरू होते. या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यानंतर बाजारात विविध प्रकारच्या मिरच्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये सातारा मिरची, काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, संकेश्वरी, तेजा, घटूर अशा प्रकारच्या मिरच्यांचा समावेश आहे. या मिरच्या खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.