मतदार यादी पुनरिक्षणाची धांदल

मतदार यादी पुनरिक्षणाची धांदल
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध टप्प्यांतील कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षकांना पूर्णवेळ कामासाठी कार्यमुक्त केले आहे. यामध्ये बहुतांश शिक्षकांचा समावेश असल्याने ऐन परीक्षेच्या काळात त्यांच्यावर कामाचा बोजा वाढला आहे. त्यांना परीक्षेची कामे सांभाळून मतदार यादीच्या संबंधित कामेही करावे लागणार आहेत.

राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (एसआयआर) लवकरच राबविण्यात येणार आहे. या कामाच्या पूर्वतयारीला निवडणूक आयोगाकडून वेग देण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातही कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला जिल्हा प्रशासनाकडून गती दिली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश जारी करीत, जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात २ ते १० एप्रिल या कालावधीत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (बीएलओ सुपरवायझर) यांना पूर्णवेळ या कामासाठी कार्यमुक्त केले आहे. या कालावधीत मॅपिंग, टेबल-टॉप अ‍ॅक्टिव्हिटी, प्रोजेनी मॅपिंग, अनमॅप्ड मतदारांचे मॅपिंग, लोकसंख्याशास्त्रीयदृष्ट्या समान नोंदींची पडताळणी, तसेच अस्पष्ट व मानवी नसलेल्या छायाचित्रांची तपासणी अशी महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत.
ज्या अधिकाऱ्यांची अथवा शिक्षकांची परीक्षा कामासाठी नियुक्ती केली आहेत, त्यांनी संबंधित दिवशी परीक्षेचे कामकाज पूर्ण करून त्यानंतरच्या दिवशी मतदार यादीशी संबंधित कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही देण्यात आले आहेत. या कामकाजाचा अहवाल बीएलओ व सुपरवायझर यांनी ७ एप्रिल आणि ११ एप्रिलला सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे. तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी संपूर्ण मोहिमेचा एकत्रित अहवाल ८ एप्रिल आणि १३ एप्रिलला उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक केले आहे. या कामात कोणतीही अनियमितता अथवा दुर्लक्ष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

शिक्षकांवर दुहेरी ताण
बारावी, दहावीच्या परीक्षा पार पडल्यानंतर शाळांमधील वार्षिक परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे परीक्षांचा कामाचा ताण शिक्षकांवर असताना, आता मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचा अतिरिक्त बोजा पडला आहे. त्यामुळे शिक्षकांवर दुहेरी ताण आला असून घर, शाळा आणि आता मतदार यादीचे काम यांमुळे शिक्षक वर्गातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com