

तो लिपिक निलंबित
केडीएमसीतील विनयभंग प्रकरण; तक्रारदार महिलेची बदली
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल होताच संबंधित लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लिपिक भूषण बळीराम पाटील याच्याविरोधात महिला कर्मचाऱ्याने अश्लील वर्तनाचे आरोप करत मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी त्याला सेवेतून निलंबित केले आहे.
आयुक्तांनी दिलेल्या आदेशात या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करत, चौकशी निष्पक्ष आणि प्रभावी होण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. संबंधित कर्मचाऱ्याला सेवेत ठेवले असता पुरावे नष्ट होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने निलंबनाचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निलंबन काळात पाटील याला पालिका मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून, वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील तक्रारदार महिलेचीही तातडीने अन्य प्रभागात बदली करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. संबंधित प्रकरणाची माहिती समाजमाध्यमांवरही मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्याने पालिकेच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तक्रार सूडबुद्धीने
तर पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावत तक्रार सूडबुद्धीने करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यांनी आपली बाजू वकिलामार्फत पोलिसांसमोर मांडल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, यापूर्वीही ते एका लाचलुचपत प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यावेळीही त्यांना निलंबित करण्यात आले होते. नंतर निलंबन आढावा समितीच्या निर्णयानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.