

सुस्थितीत रस्त्यावर नांगर
कर्जतमधील अन्य मार्गांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
कर्जत, ता. ३ (बातमीदार) : कर्जत शहरालगतच्या महामार्गावर सुरू असलेल्या कामांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एका बाजूला सुस्थितीत असलेला काँक्रीट रस्ता उखडून नव्याने बांधण्याचे काम सुरू असताना, दुसऱ्या बाजूला मुरबाड ते खोपोलीदरम्यान खड्डेमय रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्रीरामपूल ते नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार यादरम्यान काही ठिकाणी रस्ता उखडून नव्याने काम सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता फारसा खराब नसतानाही उखडण्यात आल्याने ‘ठेकेदारांच्या फायद्यासाठीच हे काम सुरू आहे का,’ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. याउलट मुरबाडकडून पळसदरीमार्गे खोपोलीकडे जाणाऱ्या मार्गावर वर्णे, तळवली, हाल, घोडिवली येथे मोठमोठे खड्डे पडले असून, हा महामार्ग ग्रामीण रस्त्यासारखा दिसत आहे.
काही ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने काम रखडल्याची माहिती आहे. दरम्यान, कडाव बाजारपेठ, वंजारवाडी पूल परिसर, कशेळे आदी भागांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, अनेक वर्षांपासून दुरुस्तीची मागणी प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, नवीन कामाच्या नावाखाली पूर्वीचा जिल्हा परिषद रस्ता उखडून टाकल्याने पर्यायी मार्गही उपलब्ध राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे या प्रश्नावर अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.
चौकट
नागरिकांचा संताप वाढतोय
महामार्गावरच चांगल्या रस्त्यावर कामे करून खराब रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. अपघातांचा धोका वाढत असून, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करून नियोजनबद्ध कामे करावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.