

ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) : दोन शहरांदरम्यानच्या गर्दीच्या मार्गांवरील प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ)कडून सुरू केलेल्या ‘जिजाऊ’ बसला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे विभागाने ११३ जिजाऊ बसची मागणी राज्य परिवहन मंत्रालयाकडे केली आहे.
ठाणे जिल्ह्यात विविध तालुके आणि उपनगरांमधून नागरिक मोठ्या प्रमाणावर कामानिमित्त ठाणे शहरात येत असतात. त्यामुळे प्रवाशांचा मोठा लोंढा एसटी वाहतुकीवर अवलंबून असतो. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून अधिक क्षमतेच्या आणि आधुनिक बसची गरज निर्माण झाली आहे. याच उद्देशाने ठाणे विभागाने जिजाऊ बसची मागणी केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जिल्ह्यातील आठ विभागांमधून एसटी महामंडळाकडून राज्यांतर्गत तसेच परराज्यांतही प्रवासी सेवा दिली जाते. त्यामुळे ठाणे विभाग हा एसटीसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या बहुतांश बसगाड्या जुन्या झाल्या असून, त्या अवस्थेतच लांब पल्ल्याच्या आणि गर्दीच्या मार्गांवर सेवा देण्यात येत आहे. परिणामी, प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ठाणे विभाग महामंडळाकडे असलेल्या गाड्यांची अवस्था आणि कमी संख्या पाहता विभागाला आणखी गाड्या मिळणे आवश्यक आहे. प्रवाशांची गरज ओळखून ठाणे एसटी विभागाने राज्य परिवहन मंत्रालयाकडे ११३ गाड्यांची मागणी केली आहे. गेल्या वर्षीही ठाणे विभागाने १०० ‘लालपरी’ बसची मागणी केली होती. त्यापैकी फेब्रुवारी २०२५ मध्ये ५० बसचा पुरवठा करण्यात आला. मात्र या वाहनांवरही प्रवाशांचा मोठा भार पडत असून, अतिरिक्त गाड्यांची आवश्यकता आहे.
सकारात्मक प्रतिसाद
जिजाऊ बस या आधुनिक असून त्यांची ५५ आसनक्षमता आहे. त्यामुळे गर्दीच्या मार्गांवर या बस अत्यंत उपयुक्त ठरतील. प्रवाशांचा प्रतिसादही सकारात्मक मिळेल. याच कारणास्तव ठाणे विभागाने ११३ जिजाऊ बसची मागणी केली आहे, असे विभागीय वाहतूक अधिकारी धनंजय शिंदे यांनी याबाबत सांगितले.
ठाणे विभागात असलेली वाहने
व्होल्वो, शिवशाही, सीएनजी, निमआराम, साधी, मानवविकास, स्लीपर - ५३७
शिवाई, ई बस, शिवनेरी - ४०
गरज : लालपरी - ८०, जिजाऊ - ११३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.