

जुईनगर, ता. ३ (बातमीदार) : जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात पूर्व व पश्चिम बाजूस असलेल्या सार्वजनिक मुताऱ्यांची दुरवस्था समोर आली आहे. यामुळे प्रवासी, रिक्षाचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतेचा अभाव, तांत्रिक बिघाड आणि अपुरी देखभाल यामुळे या सुविधा नावालाच उरल्या आहेत. याबाबत तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
स्थानकाच्या पश्चिमेकडील सुलभ शौचालय नियमितपणे बंद ठेवले जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. परिसरातील नागरिकांशी चौकशी केली असता हे शौचालय कायमस्वरूपी बंद असते आणि त्याला कुलूप लावलेले असल्याचे समोर आले. त्यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
स्थानकाच्या पूर्वेकडील मुतारीची परिस्थितीही काही वेगळी नाही. येथे पाणीपुरवठ्याची पाइपलाइन फुटलेली असून त्यातून दिवसरात्र पाणी वाहून वाया जात आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवाय पाण्याची उपलब्धता असूनही स्वच्छतेचा पूर्ण अभाव जाणवतो. प्रवासी आणि रिक्षाचालक या मुतारीचा नियमित वापर करत असले तरी अस्वच्छतेमुळे ती वापरणे कठीण होत आहे.
अस्वच्छ आणि गैरसोयीच्या वातावरणात नैसर्गिक विधी करावी लागत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या स्वच्छतागृहांची दुरुस्ती व नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दखल घेण्याची मागणी
जुईनगर स्थानकाच्या पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. एमआयडीसी आणि शिरवणे परिसरात काम करणारे कर्मचारी, वाहन शोरूममध्ये येणारे ग्राहक तसेच डी. वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी आणि रुग्णांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अशा परिस्थितीत स्वच्छतागृहांची ही अवस्था अधिकच गंभीर ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.