

मृत खलाशाचे पार्थिव परत द्या!
ओमान येथील जहाजावर हल्ला; कुटुंबीयांची याचिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : ओमानच्या किनाऱ्याजवळ गेल्या महिन्यात व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात मृत खलाशी दिक्षित सोलंकीचे पार्थिव परत मिळावे, म्हणून कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर सोमवारी (ता.६) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दिक्षित सोलंकीचे वडील अमृतलाल आणि बहीण मिताली सोलंकी यांनी ही याचिका दाखल केली असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट माहिती न मिळाल्यामुळे केंद्र सरकारला पार्थिव भारतात आणण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेतून केली आहे. याचिकेत सोलंकी कुटुंबीयांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व तपास आणि फॉरेन्सिक अहवालांची माहितीही देण्याची मागणी केली आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्रालय, बंदरे, जलमार्ग वाहतूक मंत्रालय, सागरी वाहतूक महासंचालनालय आणि ‘एमटी एमकेडी व्योम’ या जहाजाचे व्यवस्थापन करणाऱ्या व्ही शिपिंग इंडिया मर्या. कंपनीलाही प्रतिवादी करण्यात आले आहे. सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार हा व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अबाधित राहतो; त्यामुळे, मुलाचे पार्थिव कुटुंबीयांकडे परत सोपवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. कुटुंबीयांनाही पार्थिव स्वीकारण्याचा आणि अंत्यसंस्काराचा विधी पार पाडण्याचा अधिकार आहे. समुद्रात मृत्यू झाल्यास मृतदेह योग्यरित्या मायदेशी परत आणण्याच्या सागरी नियमावली व मार्गदर्शक तत्त्वाअंतर्गत असलेल्या कायदेशीर दायित्वांचाही याचिकेत आधार घेण्यात आला आहे. वस्तुस्थितीची अचूक माहिती मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार खेटा मारूनही अधिकारी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. दिक्षितचा मृतदेह शोधून मायदेशी आणण्यासाठी सुपूर्द प्रयत्न सुरू असल्याचा दावा कंपनीकडून कुटुंबाला महिन्याभरापासून देण्यात येत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
प्रकरण काय?
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनाऱ्याजवळ एमटी एमकेडी व्योम या तेलवाहू जहाजावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने ४ मार्चला हल्ला झाला. या भीषण स्फोटात इंजिन रूमला आग लागली. या हल्ल्यात मूळचा दिवचा असलेल्या आणि कांदिवली येथे राहणाऱ्या दिक्षित सोलंकीचा मृत्यू झाला. तो युद्धामध्ये बळी ठरलेला पहिला भारतीय नागरिक ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.