

स्तन कर्करोग उपचारानंतर पुनर्वसनाला महत्त्व
देश-विदेशातील तज्ज्ञ एकत्र; जीवनमान उंचावण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : नवी मुंबईतील ॲक्ट्रेक (ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर) आणि टाटा मेमोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग पुनर्वसन शिखर परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेमुळे स्तन कर्करोग रुग्णांच्या सर्वांगीण उपचारांना नवी चालना मिळणार आहे. या संमेलनामुळे स्तन कर्करोग पुनर्वसनासाठी बहुविषयक दृष्टिकोन अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
या परिषदेला देश-विदेशातून २३८ तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. यूएई, यूके, श्रीलंका आणि बांगलादेशमधील डॉक्टर, थेरपिस्ट आणि संशोधकांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती दर्शवली. यामध्ये ऑन्कोलॉजिस्ट, क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपीचे प्राध्यापक व विद्यार्थी, स्तन कर्करोग पुनर्वसन क्षेत्रातील विविध आरोग्यतज्ज्ञ सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपसंचालक डॉ. नवीन खत्री यांच्या हस्ते झाले. या परिषदेदरम्यान स्तन कर्करोगावर मात केल्यानंतर रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी पुनर्वसन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. नवीन खत्री यांनी स्पष्ट केले.
या परिषदेत तज्ज्ञांनी बहुआयामी उपचार पद्धतीवर भर दिला. शस्त्रक्रियेनंतर हाताच्या हालचाली सुधारणा, वेदना नियंत्रण, मानसिक आरोग्य आणि दैनंदिन जीवनातील स्वावलंबन यांसारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. उपचारानंतर पुनर्वसन थेरपी घेतल्यास शरीराची हालचाल सुधारते. नियमित व्यायाम आणि समुपदेशनामुळे आत्मविश्वास वाढतो. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जीवनशैली बदल केल्यास पुनरागमनाचा धोका कमी होऊ शकतो. या वेळी ऑस्ट्रेलियातील वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ व अलर्ट संस्थेचे संस्थापक संचालक प्रा. जॉन बॉयाजेस उपस्थित होते.
शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आधार
परिषदेद्वारे स्तन कर्करोग पुनर्वसनातील नव्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. तसेच रुग्णांच्या सर्वांगीण उपचारासाठी समन्वित दृष्टिकोनावर भर देण्यात आला. तज्ज्ञांनी बहुविषयक टीमच्या भूमिकेवर प्रकाश टाकत रुग्णांच्या कार्यक्षमतेत सुधारणा आणि जीवनमान उंचावण्यावर विशेष भर दिला. रुग्णांना केवळ उपचार नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आधार देणे गरजेचे आहे, असे ऑक्युपेशनल थेरपी विभागाचे डॉ. जगमोहन मीणा म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.