

‘रोबोटिक्स’मधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी
ई-यंत्र स्पर्धेत नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिके
मुंबई, ता. ४ : देशभरातील १६ राज्यांच्या ५१ महाविद्यालयांतील २२३ विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या अनेक प्रयोगांसंदर्भात ‘ई-यंत्र रोबोटिक्स’ ही स्पर्धा आयआयटी मुंबईत नुकतीच झाली. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणारे तसेच शेतीपिकांवरील साठवणूक अधिक सुरक्षित करण्यापासून ते कठीण असलेल्या फळांची प्रक्रिया अधिक सुलभ करणे इत्यादीसाठी विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन अधिक प्रभावी ठरले.
आयआयटी मुंबईतील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. यातील रोबोटिक्स आणि इनोव्हेशन चॅलेंजसंदर्भातील फेरीत शेतीपिकांसंदर्भात अनेक नवसंकल्पना आणि रोबोटिक्सचे तंत्रज्ञान लक्षवेधी ठरले. यात कांद्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आयओटी या तंत्रज्ञानाच्या आधारावर चालणारी ॲग्रीनोवा स्मार्ट ओनियन स्टोरेज सिस्टीम तसेच एआय आणि रिअल टाइम सेन्सिंगद्वारे अन्न खराब होण्यावर लक्ष ठेवून केलेली साठवण अधिक सुरक्षित करण्यासाठी ॲग्रोव्हॉल्ट इत्यादी तंत्रज्ञान या स्पर्धेत मांडण्यात आले होते. यातून कृषी पद्धती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास मोठी मदत मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा अधिक सहभाग होता.
एनईपीच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या शिक्षण विभागाअंतर्गत ई-यंत्र या प्रकल्पाला प्रोत्साहन दिले जाते. यात देशातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पनांचा विकास व्हावा, यासाठी स्पर्धा आयेाजित केल्या जातात. यंदाच्या या स्पर्धांमध्ये देशातील १,०४७ संस्थांमधून निवडलेल्या ५१ महाविद्यालयांतील २२३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात ४१ संघांनी थीम रनमध्ये स्पर्धा केली, तर १९ संघांनी प्रोजेक्ट प्रदर्शनात सहभाग घेतला. इनोव्हेशन चॅलेंजमध्ये ५९ अंतिम स्पर्धक आणि १३ शिक्षकांचा, तर रोबोटिक स्पर्धेत १५३ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
याच कार्यक्रमात ‘संशोधनातील करिअर’ आणि ‘कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची भूमिका’ यावर पॅनेल चर्चाही आयोजित करण्यात आल्या. अकादमिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी यात सहभाग घेत विद्यार्थ्यांना उदयोन्मुख संधी आणि तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष वापराविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
--
विविध प्रकल्पांचे सादरीकरण
ई-यंत्र प्रदर्शनात उपस्थितांना अत्याधुनिक नवकल्पना अनुभवायला मिळाल्या. यात चार पायांचे रोबोट, प्रगत रोबोटिक आर्म्स, स्वयंसंतुलित रोबोट, टोमॅटो वर्गीकरणासाठी स्वयंचलित प्रणाली, शिक्षण आणि गेमिंगसोबतच इनोव्हेशन चॅलेंजसंदर्भात अनेक प्रकल्पांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.