

डोंबिवलीत ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव
७१ लाखांची फसवणूक; पत्नीच्या सतर्कतेमुळे तोतया अधिकाऱ्यांचे बिंग फुटले
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : ‘तुमच्या मोबाईलवरून आक्षेपार्ह मेसेज गेले आहेत’ अशी भीती घालून आणि स्वतःला सीबीआय अधिकारी भासवून ठगांनी एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला तब्बल ७१ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातला. मात्र, पीडित व्यक्तीच्या पत्नीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा मोठा सायबर गुन्ह्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी परिसरात राहणारे महेश आगरकर यांना मार्चच्या पहिल्या आठवड्यात एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण ‘ट्राय’मधून बोलत असल्याचे सांगून आगरकर यांच्या मोबाईल क्रमांकावरून आक्षेपार्ह संदेश पाठवले गेल्याचा बनाव रचला. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असल्याचे सांगून संदीप कुमार राव आणि करण शर्मा नावाच्या व्यक्तींनी आगरकर यांच्याशी संपर्क साधला.
बनावट कागदपत्रे
आरोपींनी आगरकर यांना घाबरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची बनावट कागदपत्रे आणि बँक खात्यातील अनियमिततेचे खोटे पुरावे पाठवले. तसेच कारवाई टाळण्यासाठी पैसे भरावे लागतील, असे धमकावत आरोपींनी आगरकर यांच्याकडून वेगवेगळ्या टप्प्यांत ७१ लाख १० हजार रुपये उकळले. पैसे दिल्यानंतरही आरोपींचा त्रास कमी होत नसल्याने आगरकर यांनी आपली शंका पत्नीकडे व्यक्त केली. पत्नीने धीर धरत आरोपींना उलट प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरे संदिग्ध आढळली. कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आगरकर कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाणे गाठले.
पोलिसांचे आवाहन
सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. आरोपींचा डिजिटल मागोवा घेण्यात येत असून, त्यांच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहे. बँक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम यांनी दिली. कोणत्याही सरकारी संस्थेचा अधिकारी फोनवर पैशांची मागणी करत नाही किंवा ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाही. अशा धमक्यांना न घाबरता तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.