

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ५ : ज्येष्ठ सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी ३० मार्चला कोकण विभागीय आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उल्हासनगर महापालिकेतील प्रलंबित निवड प्रक्रियेला वेग येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापती, विषय समिती सभापती आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड लवकरच पार पडणार असल्याची माहिती शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.
रुबल अग्रवाल यांनी प्रभारी विभागीय आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर या निवडींचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. १८ मार्चला झालेल्या महासभेत स्थायी समितीसाठी सदस्यांची नियुक्ती केली होती. शिवसेनेतर्फे दिलीप गायकवाड, जमनू पुरस्वानी, राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, कलवंतसिंग सोहता, जया प्रकाश माखीजा, महेश सुखरामानी, डिंपल कुमारी ठाकूर आणि विकास खरात यांची निवड करण्यात आली. तर भाजपकडून राजेश वधारिया, अर्चना करणकाळे, कविता पंजाबी, रवि जग्यासी, दीपक (टोनी) सिरवानी, राजेश वानखडे, शंकर (शेरी) लुंड आणि संजय सिंह यांचा समावेश आहे.
यापूर्वी उल्हासनगर महापालिकेत जया प्रकाश माखीजा, राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, राजेश वधारिया आणि दीपक (टोनी) सिरवानी यांनी स्थायी समिती सभापतिपद भूषविले आहे. यावेळी स्थायी समिती सभापतिपद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि गोपाळ लांडगे कोणाला या पदावर संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी एक समिती कोणाकडे?
विषय समित्यांची संख्या आठ असून शिवसेना आणि भाजप प्रत्येकी चार समित्या वाटून घेणार आहेत. याशिवाय आणखी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव असून ती कोणत्या पक्षाकडे जाणार, याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे. मागील वेळी पाच स्वीकृत नगरसेवक होते; मात्र यावेळी त्यांची संख्या सात केली आहे. त्यापैकी शिवसेनेकडून चार आणि भाजपकडून तीन स्वीकृत नगरसेवक महासभेत सहभागी होणार आहेत. दोन्ही पक्षांकडून या पदांसाठी वजनदार नावे पुढे येण्याची शक्यता आहे.