

भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) : शहरातील मालमत्ता कर व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि थकीत करवसुलीला गती देण्यासाठी महापालिकेने जीआयएस आधारित सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
शहरात दुबार नोंदी, वादग्रस्त मालमत्ता, पाडकाम झालेल्या; तसेच अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांवर कर आकारणी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने शोधमोहीम सुरू केली. जीआयएस प्रणालीद्वारे मालमत्तांचे अचूक मोजमाप, अस्तित्व आणि करपात्रता तपासली जात आहे. पाच महिन्यांत झालेल्या सर्वेक्षणात ८०० मालमत्ताधारकांना कर निर्धारणाबाबत नोटिसा दिल्या आहेत. २५ मार्चपासून या प्रकरणांवर नियमित सुनावण्या सुरू आहेत. संबंधितांनी दिलेल्या मुदतीत कर मूल्यांकन विभागासमोर आपले म्हणणे सादर करावे; अन्यथा एकतर्फी कर निर्धारण होऊ शकते, असा इशारा कर मूल्यांकन विभागाचे उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांनी दिला आहे.
अनेक बांधकाम व्यावसायिक संपूर्ण इमारतीवर एकत्रित कर आकारणी करतात; मात्र नंतर फ्लॅटधारक स्वतंत्र नोंदणी करून स्वतःच्या नावावर मालमत्ता कर भरतात. अशा वेळी मूळ इमारतीवरील कर नोंद रद्द करणे आवश्यक असते. या विसंगतीमुळे कर व्यवस्थेत गोंधळ निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर जीआयएस सर्वेक्षणाच्या माध्यमातून मालमत्तांची अचूक नोंदणी करून करप्रणाली अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. या मोहिमेमुळे येत्या काळात करवसुलीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
३९३ कोटींची थकबाकी
भिवंडी शहरात दुबार नोंदी, पाडकाम मालमत्ता, वादग्रस्त, न सापडलेल्या तसेच पोट फाळणी झालेल्या (स्प्लिट) मालमत्तांची एकूण संख्या ६७ हजार ५०१ इतकी आहे. या सर्वांवर मिळून ३९३ कोटी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीमुळे पालिकेसमोर करवसुलीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मालमत्तेवर दृष्टिक्षेप
मालमत्ता प्रकार - संख्या थकीत मालमत्ता कर
दुबार नोंदी - ५७९०० २२० कोटी
पाडकाम - ०२८६१ ०२५ कोटी
वादग्रस्त - ०२१८० ०६८ कोटी
न सापडलेल्या - ०४००० ०५१ कोटी
पोट फाळणी - ००५६० ०२९ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.