डिजिटल युगातही टपाल सेवा ‘धीमी’

डिजिटल युगातही टपाल सेवा ‘धीमी’
Published on

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ४ : बदलापूर शहराच्या पूर्वेकडील गांधी चौक परिसरातील टपाल कार्यालयात अपुऱ्या जागेमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रणरणत्या उन्हात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह आलेल्या नागरिकांना तासन्‌तास उभे राहून प्रतीक्षा करावी लागते. बसण्याची अपुरी व्यवस्था, अरुंद व कोंदट परिसर आणि सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या या कार्यालयात टपाल, बँकिंग, विमा व विविध बचत योजनांच्या सेवा एकाच ठिकाणी दिल्या जात आहेत.
वाढती लोकसंख्या आणि मर्यादित जागेमुळे रोज लांबच लांब रांगा लागत आहेत. याशिवाय, टपाल कार्यालयात तांत्रिक सुविधांचा अभाव ही मोठी समस्या ठरत आहे. बीएसएनएलच्या इंटरनेटवर अवलंबून असलेल्या या कार्यालयात नेटवर्क नेहमीच मंद किंवा खंडित होत असल्याने सेवा विस्कळित होत आहेत. परिणामी, काही मिनिटांच्या कामासाठी नागरिकांना तासभर प्रतीक्षा करावी लागते. कोंदट व कमी प्रकाश असलेल्या जागेत कर्मचारी व पोस्टमन यांनाही दाटीवाटीत काम करावे लागते. दहा बाय दहाच्या खोलीत हजारो पत्रांचा ढीग हाताळला जात आहे. केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजना, वरिष्ठ नागरिक बचत योजना, पीपीएफ तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकसारख्या सेवा उपलब्ध असल्या तरी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्यांचा लाभ घेणे नागरिकांसाठी कठीण झाले आहे. वारंवार होणाऱ्या विलंबामुळे नागरिकांचा संताप अनावर होत असून, कर्मचारी व नागरिकांमध्ये वादाचे प्रकारही वाढत आहेत.

नवीन जागेची आशा
पोस्टमास्टर जगदीश उरुणकर यांच्या माहितीनुसार, सध्याच्या जागेचा भाडेकरार लवकरच संपणार आहे. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेकडे नवीन जागेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी शिरगाव परिसरातील राऊत आर्केड येथे पालिकेच्या मालकीच्या जागेत टपाल कार्यालय सुरू करण्याचा पर्याय दिला आहे. संबंधित जागेला टपाल विभागाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, भाडे व अनामत रकमेबाबत चर्चा सुरू आहे. वरिष्ठ सरकारी पातळीवरील निर्णयानंतर लवकरच स्थलांतराचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

नेहमी सर्व्हर डाऊन किंवा धीमा असल्याचे कारण दिले जाते. बँकिंग सेवांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. सकाळपासून दुपारपर्यंत रांगेत उभे राहावे लागते. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, त्यामुळे वाद निर्माण होतात. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा,
- स्मिता जाधव, सामान्य नागरिक

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com