धारावीतील कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’

धारावीतील कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’
Published on

धारावीतील कचऱ्याची समस्या जैसे थे
विविध उपक्रम राबवूनही कचराकोंडी सुटेना
धारावी, ता. ५ (बातमीदार) : वारंवार स्वच्छता मोहिमा राबवूनदेखील धारावीच्या अनेक वस्त्यांमध्ये अद्याप कचऱ्याची समस्या कायम आहे. विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या ओसंडून वाहत असल्याने आरोग्यविषयक आणीबाणी निर्माण झाली असून, कचराकुंडीच्या आजूबाजूला विखुरलेल्या कचऱ्यामुळे पादचाऱ्यांचे चालणेही जिकिरीचे झाले आहे. अनेक ठिकाणी तर पादचाऱ्यांना व स्थानिकांना मुठीत नाक धरून चालावे लागत आहे. यामुळे स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत.
धारावीतील आरोग्यसेवेलाही परिसरातील अस्वच्छतेचा फटका बसला आहे. अयोग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या गंभीर समस्येबाबत लोकनेते एकनाथ गायकवाड (छोटा सायन) रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतानाच कचऱ्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी, याबाबत लोकांना समजावून सांगण्याची आमची इच्छा आहे. मात्र बरेचजण स्वच्छतेचे मूलभूत नियमच पाळत नाहीत, अशा शब्दांत या रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने चिंता व्यक्त केली.
धारावीतील कचरा समस्या किती गुंतागुतीची आहे, याची कल्पना इथल्या स्थानिकांना आहे. अनेक वर्षांपासून धारावीत राहणाऱ्या पारी राजन यांच्या मते, स्वच्छतेबाबत लोकांमध्ये काही प्रमाणात जागृती आहे. मात्र नाइलाजाने त्यांना याची अंमलबजावणी करणे शक्य होत नाही. अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं याची जाणीव इथल्या स्थानिकांना आहे. पण बरेचदा जागेची कमतरता आणि अपुऱ्या मूलभूत सुविधा यांमुळे कचरा कुठेही टाकला जातो, अशी प्रतिक्रिया राजन यांनी दिली.
समाजसेवक खुर्शीद शेख यांच्या मते, मुंबई महापालिका आणि स्थानिकांकडून परिसरात स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र अपुऱ्या कचराकुंड्या तसेच कचरा टाकण्यासाठी निर्धारित केलेल्या जागांची कमतरता यातून ही समस्या वाढीस लागते. कचऱ्याची ही समस्या सोडविण्यासाठी योग्य नियोजन आणि निर्धारित जागांची उपलब्धतता याची आवश्यकता आहे.
धारावी पुनर्विकासामुळे प्रत्येक परिसरात कचरा टाकण्यासाठी पुरेशा स्वतंत्र जागा तयार होतील. कचऱ्याच्या व्यवस्थापनाची सुनियोजित यंत्रणा कार्यान्वित होईल. योग्य नियोजन आणि निर्धारित जागेच्या उपलब्धतेतून ही समस्या संपुष्टात येईल, असा विश्वास स्थानिक रहिवासी खुर्शीद यांनी व्यक्त केला.

या भागांचा समावेश
संत रोहिदास मार्ग, ६० फुटी रस्ता, कुंभारवाडा, लेबर कॅम्प, पीएमजीपी कॉलनी, संत कक्कया मार्ग, ट्रान्झिट कॅम्प आदी रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. दरम्यान, मुंबईतल्या सर्वात दाटीवाटीच्या या वस्तीत कचऱ्याचे व्यवस्थापन करून स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com